सांगलीवाडीत जुन्या भांडणातून तरूणाचा खून, १२ तासाच्या आत संशयित आरोपी अटक
By घनशाम नवाथे | Published: April 3, 2024 09:55 PM2024-04-03T21:55:35+5:302024-04-03T21:56:21+5:30
जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी पाईपने मारहाण.
घनशाम नवाथे/ सांगली : जुन्या भांडणाचा राग मनात धरून प्रतीक भिमराव गायकवाड (वय २१, रा. हारूगडे प्लॉट, सांगलीवाडी) याचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून केल्याचा प्रकार मध्यरात्री घडला. सांगली शहर पोलिसांनी १२ तासाच्या आत संशयित किशोर नामदेवराव कदम (वय ४३, रा. हारूगडे प्लॉट) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित किशोर कदम हा पूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला घोड्यांच्या शर्यतीचा नाद होता. प्रतीकला देखील याची आवड होती. त्यामुळे दोघांची मैत्री होती. परंतू किशोर आणि प्रतीक यांच्यात किरकोळ कारणावरून बऱ्याच दिवसांपूर्वी वाद झाला होता. प्रतीकचा किशोर याला राग होता. याच रागातून मध्यरात्री बाराच्या सुमारास किशोर याने प्रतीकला घरातून बाहेर बोलवून घेतले. तो बाहेर आल्यानंतर घराजवळ लोखंडी पाईपने त्याला त्वेषाने मारण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रतीक बचावासाठी आरडाओरड करून लागला. त्यामुळे त्याचे वडील भिमराव गायकवाड तत्काळ मुलाच्या बचावासाठी धावले. त्यांनी किशोरला अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोखंडी पाईपने त्यांच्याही डोक्यात मारून जखमी केले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले. तेव्हा किशोर तेथून पळून गेला.
जखमी प्रतीकला तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. परंतू उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मृत प्रतीकची आई प्रमिला गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खुनाची माहिती मिळताच उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपअधीक्षक जाधव यांनी पोलिस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पसार किशोर याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस पथके रवाना झाली होती. पसार किशोरचा शोध घेत असताना कृष्णा नदीच्या काठाजवळ तो लपून बसल्याची माहिती मिळाली. तेव्हा परिसराला घेराव घालून त्याला पकडले. पोलिस निरीक्षक संजय मोरे तपास करत आहेत.
कॅमेरा बसवला त्यात आरोपी कैद झाला-
एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे. त्यानुसार सांगलीवाडी येथील एकाने घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावला. याच कॅमेऱ्यात किशोर कदम हा स्पष्टपणे प्रतीक याच्यावर हल्ला करताना स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांना हा एक मोठा पुरावा मिळाला आहे. त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले.