कुंडलवाडीतील युवकाची गावातील सांडपाण्यावर शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:25+5:302021-06-09T04:33:25+5:30
फोटो - ०८०६२०२१-आयएसएलएम-तांदूळवाडी न्यूज कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील इम्रान पटेल या युवकाने सांडपाण्याचा वापर करत घेतलेले उसाचे पीक. सुनील ...
फोटो - ०८०६२०२१-आयएसएलएम-तांदूळवाडी न्यूज
कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील इम्रान पटेल या युवकाने सांडपाण्याचा वापर करत घेतलेले उसाचे पीक.
सुनील चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील सामान्य कुटुंबातील इम्रान बापूलाल पटेल या युवकाने २० गुंठे क्षेत्रात गावातील सांडपाण्याचा आधार घेत ऊसपिकाचे उत्पादन घेत एक लाखाचे उत्पन्न मिळविले.
इम्रानचे आई-वडील निरक्षर, तसेच परिस्थितीची हलाखीची. वडील व्यसनाधीन बनलेले. इम्रानने एम. ए. डी. एड्.पर्यंतचे शिक्षण घेतले. बरीच वर्षे तो नोकरीच्या शोधात फिरला. गावागावांतील बाजारात कांदा-बटाटा विकण्याचा व्यवसायही केला. कोरोनासारख्या संकटाने तोंड बाहेर काढल्यावर त्याचा छोटा व्यापार ठप्प झाला. त्याच्याकडे वडिलार्जित २० गुंठे शेती आहे. या शेतामध्येच राबण्याचा विचार करत त्याने तो कृतीतही आणला.
विकतचे पाणी घेऊन शेती करणे आवाक्याबाहेरचे आहे, हे ओळखून इम्रानने शेताच्या बांधाशेजारी गावातील सांडपाणी साचलेला खड्डा हेरला. त्याची खुदाई केली. त्यामध्ये साचणाऱ्या पाण्यावरच ऊस लागवड केली. या सांडपाण्याच्या वापरावर उसाचे पीक जोमात आले. ते बघून इतर शेतकऱ्यांकडून बियाण्यांची मागणी सुरू झाली. त्यावर इम्रानने १२ गुंठ्यातील ऊस बियाणांची विक्री करून ७८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. उर्वरित आठ गुंठे ऊस कारखान्याला घालवून त्यातून त्याला २४ हजार ७३० रुपयांची कमाई झाली.