कवलापुरात युवकाची आत्महत्या

By admin | Published: June 4, 2017 01:14 AM2017-06-04T01:14:23+5:302017-06-04T01:14:23+5:30

पत्नीला विष पाजले : आजारपणाला कंटाळून कृत्य

Youth suicide in Kavalpur | कवलापुरात युवकाची आत्महत्या

कवलापुरात युवकाची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पत्नीला विष पाजून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर कृष्णा भोसले (वय २९) व पूजा शंकर भोसले (२५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. शंकरला कर्करोगाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्याला दोन महिने जगणार असल्याचे सांगितले होते, यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.
कुंभारी (ता. जत) येथील शंकर भोसले गेल्या अनेक वर्षांपासून कवलापुरातील मायाक्कानगरमध्ये
आई, वडील, पत्नी व मुलांसोबत राहत होता. त्याचा भाऊ कुटुंबासह गोव्यात नोकरी करतो. शंकरला पोलीस भरती व्हायचे होते; पण तो झाला नाही. सध्या तो कुपवाड एमआयडीसीत एका कंपनीत नोकरी करीत होता. त्याला मयुरी (४ वर्षे) व दर्शन (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. महिन्यापूर्वी शंकरची प्रकृती बिघडली होती. त्याने डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली. यामध्ये त्याला कर्करोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. डॉक्टरांनी ही बाब त्याला बोलून दाखविली, तसेच तुझे दोन-तीन महिने आयुष्य आहे, असे सांगितले होते. तेव्हापासून तो चिंताग्रस्त बनला होता. पत्नी पूजाला त्याने हा प्रकार सांगितला. तेव्हा तिलाही धक्का बसला. यातून दोघांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येचा मार्ग निवडला.
शनिवारी शंकरचे वडील मजुरीसाठी शेतात गेले होते. आई परगावी गेली होती. शंकरची दुपारी चार ते रात्री बारा अशी ड्युटी होती. त्यामुळे तो घरी होता. मुले घराबाहेर खेळायला गेल्यानंतर त्याने पत्नीच्या दोन्ही हाताच्या शिरा कापल्या. तसेच तिला विष पाजले. पत्नी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने घराच्या छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतला. मुले पाणी पिण्यासाठी घरी आली, त्यावेळी आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. दोघांनाही तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी शंकरला मृत झाल्याचे घोषित केले. पूजावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपनिरीक्षक गणेश शिंदे, हवालदार संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आत्महत्येपूर्वी चिठ्ठी
शंकर भोसले याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यामध्ये त्याने ‘मी व पूजा विष पिऊन आयुष्य संपवित आहे. माझी मुले मयूरी व दर्शनचा सांभाळ करा. माझा भाऊ नंदू खूप चांगला आहे. मी पोलीस भरती झालो नाही, पण माझा भाचा अनिल याने भरती व्हावे. माझ्या आई, वडिलांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी आम्हाला माफ करावे’, असे लिहिले आहे. चिठ्ठीतील हा मजकूर पोलिसांनी नातेवाइकांना वाचून दाखविला. चिठ्ठीत कर्करोगाची लागण झाल्याबाबत कोठेही उल्लेख नाही.

Web Title: Youth suicide in Kavalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.