तरुण वळला शेती, दुग्ध व्यवसायाकड
By admin | Published: December 11, 2014 10:46 PM2014-12-11T22:46:30+5:302014-12-11T23:41:23+5:30
म्हैसाळ परिसरातील चित्र : शिक्षणाचा आधुनिक शेतीसाठी उपयोगे
सुशांत घोरपडे- म्हैसाळ -शासकीय खात्यातील रिक्त जागा सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेत कमी असल्याने आता सुशिक्षित बेरोजगार खासगी नोकरीपेक्षा शेती व दुग्ध व्यवसायाला पसंती देत असल्याचे चित्र म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, ढवळी, वड्डी या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
पूर्वीच्या काळी मुलगा पदवीधर झाला की त्याला नोकरी मिळत होती. सरकारने सर्व शिक्षण अभियान सुरू केले व जास्तीत जास्त मुला-मुलींना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वीही झाला. पण त्यांना आवश्यक असणारे उद्योगधंदे व नोकऱ्या याकडे मात्र सरकारने पाठ फिरवली. मग ही जबाबदारी सरकार घेणार की नाही? हा खरा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. आज खासगी कंपनीत नोकरीला लागल्यावर त्याला तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. म्हणजे त्याचा पगार शेतात काम करणाऱ्या मजुरापेक्षाही कमी असतो व मानसिक संतुलन राहत नाही, असा समज या सुशिक्षित बेरोजगारांचा झाला आहे.
या कारणामुळे अनेकजण शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळल्याचे चित्र आहे. काही तरुण आपली शेती उत्तमरित्या करत आहेत, तर काहीजण शेतामध्ये रोजगार करणे पसंत करीत आहेत. शेतीमध्ये ऊस, द्राक्षे, केळी ही पिके या परिसरात मोठ्या प्रमाणावर येतात. या पिकांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे मजुरांना शेतकऱ्यांकडून चांगला पगार दिला जातो. तसेच दुग्ध व्यवसाय हा शेती व मजुरी करीत करता येतो. यासाठी या तरुणांना सोसायट्या कर्जे उपलब्ध करून देतात व त्या सोसायट्यांमार्फत जनावरांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेती व मजुरी करत करता दुग्ध व्यवसाय करता येतो, असा ठाम विश्वास या युवकांच्या मनात ठसला आहे. उच्च शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळेल का? असा प्रश्न ग्रामीण भागातील पालक वर्गाला पडतो.
सरकारी खात्यात रिक्त पदे कमी असतात. यामुळे अनेकांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागते. खासगी कंपनीत पगार कमी दिला जातो. त्याऐवजी शेतीमध्ये व दुग्ध व्यवसायामध्ये आपण जास्त पैसे कमवू शकतो. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज पुरवठाही उपलब्ध आहे.
- प्रशांत घरबडे
एमबीए, सुशिक्षित बेरोजगार