लुटमार करणारी टोळी सांगलीत जेरबंद -चौघांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 02:11 PM2018-11-20T14:11:04+5:302018-11-20T14:20:28+5:30
येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले.
सांगली : येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. रविवारी रात्री लुटमारीची ही घटना घडली होती.
अटक केलेल्यांमध्ये गणेश दादासाहेब पांढरे (वय २०, रामकृष्णनगर, कुपवाड), संतोष शिवाजी तंगडी (३२), रोनीत रमेश पुजारी (२२, दोघे रा. टिंबर एरिया, गुरुद्वारसमोर, सांगली), सुजित दादासाहेब चंदनशिवे (२३, रा. अग्नीशमन विभाग, कार्यालयासमोर, नवीन वसाहत, सांगली) यांचा समावेश आहे.
आर. प्रसाद हे कडाप्पा येथील एस. व्यंकटेश वसलू यांच्या ट्रकवर (क्र. एपी ०४ टीडब्ल्यू ८९८९) चालक म्हणून काम करतात. ते फौंड्रीसाठी लागणारी वाळू ट्रकमधून घेऊन सांगलीत आद्योगिक वसाहतमध्ये आले होते. वाळू खाली करुन गोकूळनगरजवळील रोहित रोडवेजवळ त्यांनी ट्रक उभा केला. रात्री ते ट्रकमध्ये स्वयंपाक करीत होते. त्यावेळी संशयित दुचाकीवरुन आले. त्यांनी आर. प्रसाद यांच्याकडे पन्नास रुपये मागितले. प्रसाद यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संशयितांनी त्यांना दगडाने मारहाण करुन त्यांच्या खिशातील तीन हजाराची रोकड घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. परिसरात त्यांनी चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासणीचे कामही सुरु होते. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार युवराज पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले यांचे पथक संजयनगर पोलीस ठाण्याच्याहद्दीत गस्त घालत होते. चौघेही संशयित दोन दुचाकीवरुन फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पण ते उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी ट्रक चालकास लुटल्याची कबूली दिली.
गंभीर गुन्हे
टोळीतील तंगडी, पुजारी व चंदनशिवे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध बोगस धनादेश, चोरी, मारामारीचे गुन्हे नोंद आहेत. ट्रक चालक लुटीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून लुटमारीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी व्यक्त केली.