सांगलीत आढळला ‘झिका’चा रुग्ण, परिसरात सर्वेक्षण; आरोग्य यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 11:46 AM2024-07-13T11:46:20+5:302024-07-13T11:46:36+5:30
४ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी
सांगली : सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गुरुवारी ‘झिका’चा रुग्ण आढळल्याने महापालिका, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध बनली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेने सिव्हिल हॉस्पिटल, बस स्थानक रस्ता परिसरात १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली. यामध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे.
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका ८२ वर्षांच्या वृद्धाच्या रक्त चाचणीचा अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात ‘झिका’चे रुग्ण पुण्यात जास्त आढळून आले आहेत. सांगलीतील अनेक नागरिकांचा पुण्याशी रोजचा संपर्क असतो. त्यामुळे गुरुवारी झिकाचा रुग्ण आढळल्याने महापालिका, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
महापालिका आरोग्य यंत्रणेने सांगली सिव्हिल हॉस्पिटलजवळील बस स्थानक रस्त्यावर १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली आहे. तपासणी झालेल्यांमध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे. या गर्भवतींमध्ये तापाचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सात गर्भवतींचे रक्तजल नमुने ‘झिका’ तपासणीसाठी पुण्याला ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. सर्वेक्षणात किरकोळ तापाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गर्भवतींचा समावेश नाही. ताप रुग्ण असलेल्या पुरुषांचे रक्त नमुने मलेरिया तपासणीसाठी घेतले आहेत.
दरम्यान, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी शुक्रवारी महापालिका क्षेत्रातील २२ वैद्यकीय अधिकारी व ८० आरोग्यसेविकांची बैठक घेतली. ‘झिका’ रुग्ण आढळल्यामुळे गर्भवतींवर लक्ष ठेवा. त्यांना ताप असल्यास तातडीने रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.