जिल्हा परिषदेचा लिपिक २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:22+5:302021-05-21T04:27:22+5:30
सांगली : कामाचे प्रलंबित असलेल्या बिलाची रक्कम खात्यावर जमा करून, अनामत रक्कम परत करण्याच्या मोबदल्यापोटी २५ हजारांची लाच स्वीकारताना ...
सांगली : कामाचे प्रलंबित असलेल्या बिलाची रक्कम खात्यावर जमा करून, अनामत रक्कम परत करण्याच्या मोबदल्यापोटी २५ हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले. अरुण योगीनाथ कुशिरे (वय ५७, रा. उरूणवाडी, इस्लामपूर) असे त्याचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत त्यांनी केलेल्या कामाचे बिल प्रलंबित होते तसेच या कामापोटी विभागाने भरून घेतलेली अनामत रक्कमही दिलेली नव्हती. यासाठी तक्रारदाराकडे कुशिरे याने ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली हाेती. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर कुशिरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात अरुण कुशिरे यास २५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांत कुशिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, सलीम मकानदार, राधिका माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चाैकट
शासकीय अथवा इतर विभागांतील कोणत्याही कर्मचाऱ्याने कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपअधीक्षक घाटगे यांनी सांगितले.