रुग्णवाहिकांसाठी जिल्हा परिषदेला मिळाले चार कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:27 AM2021-05-19T04:27:56+5:302021-05-19T04:27:56+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी मंगळवारी कामेरी येथे कोरोनास्थितीचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद ...
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी मंगळवारी कामेरी येथे कोरोनास्थितीचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. चौदाव्या वित्त आयोगातील निधीच्या व्याजाच्या रकमेतून हे पैसे मिळाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेतर्फे तीस रुग्णवाहिका खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बीएस ६ श्रेणीच्या रुग्णवाहिका आरोग्य केंद्रांना दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय शासनाकडूनही सात रुग्णवाहिका मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दिली. दोनच महिन्यांपूर्वी सुमारे १४ कोटी रुपये खर्चून चौदा रुग्णवाहिका आरोग्य केंद्रांसाठी दिल्या होत्या, त्यानंतर आता पुन्हा नव्याने ३७ मिळत असल्याने जुन्या भंगार रुग्णवाहिकांची समस्या संपुष्टात आल्याचे कोरे म्हणाल्या. मंगळवारी त्यांनी पेठ, नेर्ले, कामेरी व इस्लामपूर पंचायत समितीला भेटी देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची त्वरित कोरोना चाचणी करून उपचार देण्याची सूचना केली. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. यावेळी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील, पंचायत समिती सदस्य दाभोळे, कार्यकारी अभियंता वृंदा पाटील, नेर्लेच्या सरपंच छायाताई रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, शरद बल्लाळ, ग्रामविस्तार अधिकारी एम. डी. चव्हाण, तलाठी पंडित चव्हाण आदी उपस्थित होते.
चौकट
मुश्रीफ यांची आश्वासपुर्ती
कोल्हापुरातील एका कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णवाहिकांसाठी निधीची जाहीर मागणी केली होती, त्याला प्रतिसाद देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार कोटी रुपये देण्याची घोषणा याच कार्यक्रमात केली. या आश्वासनाची पूर्तता करत मुश्रीफ यांनी निधीचा धनादेश पाटील यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला.