जिल्हा परिषदेतील सत्तेत स्वारस्य नाही
By admin | Published: February 27, 2017 12:08 AM2017-02-27T00:08:02+5:302017-02-27T00:08:02+5:30
जयंत पाटील; काँग्रेसला उशिरा शहाणपण सुचले; काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीलाच टार्गेट
सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव होता; पण काही ठिकाणी आघाडी झाली, तर काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच एक नंबरचा शत्रू मानत होते. आता दोन्ही पक्षांच्या आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
राष्ट्रवादीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाबद्दल ते म्हणाले की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी इच्छुक नाही. जनतेने आम्हाला विरोधात बसविले आहे. जिल्'ात जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यात आम्हाला यश आले नाही. निवडणुकीनंतर संख्याबळाची जमवाजमव करून जनमताचा अनादर करण्याची आमची इच्छा नाही. काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जिल्हा परिषद सत्तेसाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, ज्यांना सत्तेसाठी हालचाली करायच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मतांची गोळाबेरीज आम्हाला करायची नाही. पण काँग्रेसला प्रयत्न करायचे असल्यास त्यांनी ते करावेत. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांनी आघाडी करावी, अशी भूमिका आमची होती. त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्नही केले. पण जिल्हास्तरावरील नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच शत्रू मानत होते. आता निकालानंतर काँग्रेसला शहाणपण आले आहे. पण जोपर्यंत काँग्रेस हा भाजपला शत्रू मानत नाही, तोपर्यंत दोन्ही पक्षांच्या आघाडीला काहीच अर्थ नाही. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करणार का? याबद्दल विचारता ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. योग्य वेळ आल्यानंतर पाहू, असे पाटील म्हणाले.
बंडखोरांना थारा नाही
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेल्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यावरील कारवाईची प्रक्रिया पार पडली आहे. त्याबरोबरच बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांना आम्ही सोबत घेणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.