जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:15 PM2022-02-05T17:15:45+5:302022-02-05T17:16:23+5:30

नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट

Zilla Parishad, Panchayat Samiti constituency restructuring is complete in sangli | जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

Next

सांगली : जिल्हा परिषद ६८ आणि पंचायत समिती १३६ मतदारसंघाची पुनर्रचना महसूल विभागाकडून जवळपास पूर्ण झाली आहे. या मतदारसंघ पुनर्रचनेत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या मतदारसंघाची तोडफोड केल्याचा इच्छुकांकडून आरोप होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा कधी प्रसिद्ध होणार? आणि मतदारसंघ कसा असेल? याची उत्सुक्ताही इच्छुकांना लागली आहे. नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुदतीत गट व गणांचा कच्चा आराखडा तयार केला; परंतु तो प्रसिद्ध केला नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मतदारसंघ कसा असेल, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. 

याबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदारसंघ आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे केले आहेत, असा काही जिल्हा परिषद सदस्यांकडून आरोप होत आहे. काही सदस्यांना आपल्या मतदारसंघाचे खूपच खूपच तोडफोड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोहोचली आहे. यामुळे ते सदस्य खूपच चिंतित आहेत.

निवडणुका मे महिन्यात

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी, तर दहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपत आहे. कमाल १२ जानेवारी २०२२ पर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप गट, गणरचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित मुदतीत निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगानेही दोन महिने निवडणुका पुढे जाणार असे जाहीर केले आहे. या सर्वांचा विचार केल्यास मे महिन्यांनंतरच निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण झाली असेल तर प्रशासनाने प्रारूप आराखडा जनतेसाठी खुला करावा. गुपचूप मतदारसंघाची तोडफोड करून जनतेला अंधारात ठेवले तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. भौगोलिक विचार करूनच मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे. यामध्ये काही गोलमाल केले तर न्यायालयात आम्ही धाव घेणार आहे.  -जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद, काँग्रेस

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti constituency restructuring is complete in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.