राज्यातील जिल्हा परिषदेची नोकरभरती पुन्हा लांबणीवर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांचा नकार
By अशोक डोंबाळे | Published: February 14, 2023 02:15 PM2023-02-14T14:15:33+5:302023-02-14T14:16:04+5:30
जिल्हा परिषद नोकरभरती घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रालयस्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह अन्य विभागाकडील तीन अशा चार सचिवांची समिती गठित
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून आदेशही काढला होता. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेकडील १३ हजार ५२१ कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकाऱ्यांनी वेळापत्रकही जाहीर केले. पण, खासगी कंपन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नकार दिल्यामुळे नोकरभरती पुन्हा लांबणीवर गेली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकरभरती करण्यास राज्य सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये हिरवा कंदील दाखवला होता. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाहनचालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया चालू झाली होती. शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम केली आहे.
१ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. ८ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागवून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यायची होती. पण, शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद नोकरभरतीची जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही. शासनाने जिल्हा परिषद नोकरभरतीचे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील दीड महिन्याचा कालावधी संपला आहे.
याबद्दल ग्रामविकास विभागाकडे विचारणा केल्यानंतर नोकरभरतीचा धोरणात्मक निर्णय झाला नाही. यामुळे भरती प्रक्रिया थांबली आहे. काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले की, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी संस्था इच्छुक नाहीत. संबंधित कंपन्यांकडे एवढी मोठी यंत्रणा नसल्यामुळे नोकरभरती थांबली आहे.
चार सचिवांची समिती
जिल्हा परिषद नोकरभरती घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रालयस्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह अन्य विभागाकडील तीन अशा चार सचिवांची समिती गठित केली आहे. ही समिती अभ्यास करून नोकरभरतीबद्दल ठोस धोरण निश्चित करणार आहे. त्यानंतरच जिल्हा परिषद नोकरभरतीचा निर्णय होणार आहे. पण, समिती गठित करूनही महिन्याचा कालावधी संपला असून तरीही निर्णय नसल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे.