जिल्हा परिषद घोटाळा; कारवाई करा : बागडे
By admin | Published: April 13, 2016 12:19 AM2016-04-13T00:19:25+5:302016-04-13T00:42:00+5:30
अधिकाऱ्यांच्या निलंबनाची नाईक यांची मागणी
सांगली : जिल्हा परिषदेच्या बॅटरी, स्प्रे-पंप, शिलाई यंत्र व मुलींच्या सायकल खरेदीतील घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने पुणे विभागीय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, आ. शिवाजीराव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करून चौकशी करण्याची मागणी केली.
शिराळ्याचे आमदार नाईक यांनी लक्षवेधी मांडताना म्हटले आहे की, जिल्हा परिषद कृषी विभागाने बाजारपेठेतील बॅटरी, स्प्रे-पंपाची किंमत लक्षात घेतली नाही, याकडे खरेदी समितीने दुर्लक्ष करून पडगीलवार अॅग्रो या पुरवठादारास ४५२९ रुपयांप्रमाणे बॅटरी, स्प्रे-पंप पुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. अधिकाऱ्यांनी पुरवठादाराचे हितरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारभावापेक्षा प्रति नग १५३१ रुपये जादा दराने बॅटरी, स्प्रे-पंपाचा पुरवठा झाला आहे. त्यातून जिल्हा परिषदेस वीस लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शिलाई यंत्रांची खरेदी प्रक्रियाही संशयास्पद आहे. यामध्ये सुमारे १४ लाख १० हजार रुपयांचा गोलमाल झाला आहे. याच विभागाकडून सायकल खरेदीही केली असून, यामध्येही ठराविक पुरवठादारास निविदा मिळावी म्हणून अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. जत येथील हातपंप दुरुस्तीसाठीच्या साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे यांनी, अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.परंतु, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विधानसभा सभापती बागडे यांच्या उत्तरावर नाईक यांचे समाधान झाले नाही. नाईक यांनी जिल्हा परिषद निविदा मॅनेजमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी केली.