उन्हाचा कडाका वाढला, सांगलीत उद्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात
By अशोक डोंबाळे | Published: March 7, 2023 04:48 PM2023-03-07T16:48:33+5:302023-03-07T16:49:13+5:30
शिक्षक संघटनांच्या मागणीला यश
सांगली : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शिक्षक भारती, शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदशाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळा बुधवार दि. ८ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई, वीज कपात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी शिक्षक संघ, शिक्षक भारती उर्दू संघटना, शिक्षक भारती आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती.
त्यानुसार नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा दि. ८ मार्चपासून सकाळी ७.२० वाजता सुरू होणार आहेत. मधली सुटी सकाळी साडे नऊ ते दहा असणार आहे. त्यानंतर दुपारी साडे अकरा वाजता शाळा सुटणार आहे. सकाळी पहिले दहा मिनिटे हे परिपाठला असणार आहेत.
चाचणी परीक्षा होईल; पण रविवारी नाही
पहिली, दुसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा रविवारी घेऊ नये, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार रविवारचा दिवस वगळून शाळेच्या वेळेतच परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी घेतला आहे.