जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात येणार
By admin | Published: October 19, 2016 11:48 PM2016-10-19T23:48:55+5:302016-10-19T23:48:55+5:30
मोहनराव कदम : निवडणुकीत स्थानिक आघाड्या, गट, कुरघोड्यांचे राजकारण चालणार नाही
सांगली : स्थानिक आघाड्या, युवा मंच, गट असे कोणतेही प्रकार जिल्हा परिषद निवडणुकीत खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढविल्या जातील. काँग्रेसला चांगले वातावरण असून यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ता येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पक्षीय तयारी आता सुरू झाली आहे. २५ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधित इच्छुकांनी पक्षाकडे आपले सशुल्क अर्ज दाखल करायचे आहेत. यंदा जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसला चांगले वातावरण आहे. तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याने स्थानिक आघाड्या, विविध नेत्यांच्या नावचे मंच, गट असे प्रकार चालणार नाहीत. तसे आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार प्रदेश कार्यकारिणीकडे तातडीने केली जाईल. पक्षाने आखून दिलेल्या शिस्तीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी काम करावे.
पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासंदर्भात संबंधित तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही ठिकाणी आघाडीची, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची मागणी केली जात आहे. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात जाऊन परिस्थितीचा अभ्यास करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपला अहवाल जिल्हा कार्यकारिणीकडे सादर करतील. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आघाडी करायची, की स्वबळावर लढायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. २१ आॅक्टोबरपर्यंत इच्छुकांना पक्षाकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन त्यामध्ये हे अर्ज सादर होतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
माझ्यावर अन्याय नाही...
पक्षात प्रदीर्घ काळ काम करताना मला कोणतेही मोठे पद मिळाले नाही, म्हणून मी नाराज नाही. कोणत्याही पदाची कधीही अपेक्षा ठेवलेली नाही. मोठ्या पदांपेक्षा मला पक्षीय कार्यात अधिक रस आहे.
राष्ट्रवादी विरोध करणार नाही
सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. पक्षाने आदेश दिला, तर ही निवडणूक लढवून ती जिंकण्याचीही खात्री वाटते. राष्ट्रवादीने या जागेवर हक्क सांगितला असला तरी, माझ्या नावाला त्यांचा विरोध राहणार नाही, असे कदम म्हणाले.