जातीच्या दाखल्याबद्दल आक्षेप; निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 08:34 PM2020-01-02T20:34:47+5:302020-01-02T20:36:56+5:30
ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्यात आली. राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांच्यासह काही नेत्यांनी तात्काळ वकिलांना बोलावून त्याबाबत मार्गदर्शन घेतले.
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित होते. यासाठी भाजपकडून प्राजक्ता कोरे यांनी अर्ज दाखल केला होता. कोरे यांचा जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आमची भूमिका जाणून घेतली नाही. याबद्दल वकिलामार्फत लगेचच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अध्यक्ष निवडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्यात आली. राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांच्यासह काही नेत्यांनी तात्काळ वकिलांना बोलावून त्याबाबत मार्गदर्शन घेतले. कोरे यांच्या अर्जाविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी नाईक, काँग्रेसच्या कलावती गौरगौंड, जितेंद्र पाटील, विशाल चौगुले यांनी हरकत घेऊनही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमची बाजू जाणून घेतली नाही. आम्हाला वकिलामार्फत बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. आमचे वकील अॅड्. अमित शिंदे यांनी बाजू मांडण्यासाठी सदस्यांकडून सर्व कागदपत्रे घेतली होती. कर्नाटकातील ओबीसीचा दाखला महाराष्ट्रात चालत नाही, अशी भूमिका होती. तरीही अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अन्याय केला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उच्च न्यायालयातही लगेचच याचिका दाखल करणार असून निकाल आमच्या बाजूनेच लागेल.
चौकट
डोंगरेंच्या प्रतिज्ञापत्रात चुका
उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नाही. त्यांच्या पत्नीही सदस्या आहेत, त्यांच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोन मुलांचा उल्लेख आहे. याबाबत हरकत घेण्यात आली. भाजपकडून त्यांचा एकमेव अर्ज असल्याने हरकत घेऊन कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत करूनही, त्यांची सत्तेची गणिते फोल ठरली.
- बार कौन्सिलकडे तक्रार
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीवर कागदपत्रे न घेता व वकिलांना सुनावणीसाठी संधी न देता बेकायदेशीरपणे छाननी प्रक्रिया राबविली, असा आरोप अॅड्. अमित शिंदे यांनी केला. अधिकाºयांच्या या भूमिकेविरोधात बार कौन्सिलकडे तक्रार करणार आहे, असे ते म्हणाले.