जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

By admin | Published: June 7, 2017 12:19 AM2017-06-07T00:19:05+5:302017-06-07T00:19:05+5:30

जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

Zilla Parishad's Job Recruitment Error | जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या असून, त्याबाबत खुलासा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली. समितीच्या स्वागतावरून मात्र काही काळ जिल्हा परिषदेत मानापमान नाट्यही घडल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या समितीमध्ये आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश गजभिये, आ. सुभाष साबणे यांची उपस्थिती होती. अध्यक्ष संग्रामसिंंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक असल्याने अध्यक्ष देशमुख व उपाध्यक्ष बाबर सभागृहातून बाहेर पडले.
समितीचे सदस्य सोमवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. समितीचे सदस्य आले असताना, कुणी अधिकारी नसल्याने सदस्य नाराज होते. बैठकीच्या प्रारंभीच समितीच्या सदस्यांनी कुणी अधिकारी फिरकले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत नोकरभरती व अनुशेष भरण्यावरून अनेक तांत्रिक त्रुटी समितीच्या निदर्शनास आल्या. जिल्हा परिषदेतील अनुशेष भरला नसल्याच्या कारणावरुन समितीच्या सदस्यांनी खुलासा करण्याची सूचना केली. त्यानंतर खातेप्रमुखांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले असल्याचे कारण दिले, मात्र त्यासाठी मार्गदर्शन घेण्याची गरज काय आहे?, असा प्रतिप्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आले नाही. राज्यस्तरीय समिती दौऱ्यावर येणार असताना अधिकाऱ्यांनी होमवर्क केला नसल्याचे स्पष्ट झाले. अन्य खातेप्रमुखांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारण्यात आला.
राज्यस्तरीय अनुसूचित जाती कल्याण समिती (एस. सी.) सांगलीमध्ये दाखल झाली असताना, जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी स्वागताला आला नसल्याने समिती सदस्य नाराज झाले होते. त्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेही.
पत्रकारांशी बोलताना सुरेश खाडे म्हणाले, समितीमार्फत मागासवर्गीय अनुशेष व्यवस्थित भरला आहे की नाही, शासन अनुदानाचा योग्य विनियोग याबाबत पाहणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अनुशेष भरतीत अनेक चुका आढळल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. त्याबाबतची दुरुस्ती होईल.

Web Title: Zilla Parishad's Job Recruitment Error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.