जिल्हा परिषदेत दिग्गज बोल्ड! -आरक्षण सोडत
By admin | Published: October 6, 2016 12:17 AM2016-10-06T00:17:05+5:302016-10-06T01:13:42+5:30
: विद्यमान सदस्यांचे मतदारसंघ आरक्षित; अध्यक्षपदाच्या दावेदारांचा अपेक्षाभंग
सांगली : जिल्हा परिषदेतील सर्वच्या सर्व ६२ विद्यमान सदस्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे अध्यक्षपदाच्या बहुसंख्य दावेदारांची स्वप्ने बुधवारी धुळीस मिळाली. ६० पैकी ३७ मतदारसंघ बुधवारी खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, त्यातील १८ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. ओबीसींसाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) १६ आणि अनुसूचित जातीसाठी सात मतदारसंघांवर आरक्षण पडले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्याने सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, जितेंद्र पाटील, सुहास बाबर, अभिजित पाटील या मातब्बरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते. मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट कमी होऊन ६० झाले आहेत. यातील सात गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. विद्यमान सदस्या मनीषा पाटील यांचा दिघंची, राधाबाई हाक्केंचा ढालगाव आणि बेडग हे तीन गट अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी आणि विद्यमान सदस्य फिरोज शेख यांचा लेंगरे, डॉ. नामदेव माळी यांचा भाळवणी, रणधीर नाईक यांचा वाकुर्डे बुद्रुक हे चार गट अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
खुल्या प्रवर्गासाठीचे दिग्गजांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. काहींनी सोडतीवर आक्षेप घेतल्यानंतर काही काळ सोडत थांबविण्यात आली. या वादावर जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, २०१२ च्या निवडणुकीत जे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत, त्या मतदारसंघात पुन्हा महिला आरक्षण टाकले जाणार नाही. त्यानंतर पुन्हा महिला आरक्षण काढण्यात आले. फेरआरक्षण सोडतीमध्ये अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील विद्यमान उपाध्यक्ष रणजित पाटील, देवराज पाटील, शिवाजी डोंगरे, अमरसिंह देशमुख, बसवराज पाटील, सम्राट महाडिक, भीमराव माने, लिंबाजी पाटील, संजीवकुमार सावंत यांचे मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले. कडेगाव नगरपंचायत झाल्यामुळे विद्यमान सदस्य शांताराम कदम यांचा मतदारसंघच रद्द झाला आहे. शिवाय कडेगाव तालुक्यातील तडसर, वांगी, देवराष्ट्रे हे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना तालुक्यातून निवडणुकीस उभे राहता येणार नाही.
आरक्षित मतदारसंघ
अनुसूचित जाती पुरुष : दिघंची, बेडग, ढालगाव. अनुसूचित जाती महिला : लेंगरे, भाळवणी, बावची, वाकुर्डे बुद्रुक. ओबीसी पुरुष : रेठरेहरणाक्ष, पेठ, येलूर, मालगाव, आटपाडी, दरीबडची, मांजर्डे, येळावी. ओबीसी महिला : पणुंब्रे तर्फ वारुण, मांगले, आरग, समडोळी, म्हैसाळ, मुचंडी, तडसर, दुधोंडी. सर्वसाधारण महिला : बिळूर, देशिंग, वाटेगाव, बुधगाव, करगणी, संख, बनाळी, शेगाव, वांगी, देवराष्ट्रे, कुची, रांजणी, कासेगाव, वाळवा, कामेरी, भोसे, एरंडोली, कवठेपिरान.
यांना बसला धक्का : कासेगाव : देवराज पाटील. वाटेगाव : रवींद्र बर्डे. पेठ : सम्राट महाडिक. वाकुर्डे बुद्रुक : रणधीर नाईक. करगणी : अमरसिंह देशमुख, विजयसिंह पाटील, अण्णासाहेब पत्की. आटपाडी : तानाजी पाटील. भोसे : दिनकर पाटील. कवठेपिरान : भीमराव माने. येळावी : विद्यमान अध्यक्षा स्नेहल पाटील. कामेरी : विद्यमान उपाध्यक्ष रणजित पाटील, जयराज पाटील. बनाळी : संजीवकुमार सावंत. ढालगाव : चंद्रकांत हाक्के. रांजणी : राजवर्धन घोरपडे. कडेगाव : शांताराम कदम. वाळवा : राजेंद्र पाटील, गौरव नायकवडी. बुधगाव : शिवाजी डोंगरे, बजरंग पाटील. बिळूर : पी. एम. पाटील, संख : बसवराज पाटील.
यांना अध्यक्षपदाची लॉटरी शक्य
कोकरूड गट : सत्यजित देशमुख. कुंडल : शरद लाड, महेंद्रअप्पा लाड. कडेपूर : संग्रामसिंह देशमुख. विसापूर : सुनील पाटील. सावळज : किशोर उनउने, चंद्रकांत पाटील, सुखदेव पाटील, स्मिता पाटील. चिंचणी : अमित पाटील, प्रभाकर पाटील. बोरगाव : जितेंद्र पाटील. नागेवाडी : सुहास बाबर, अमोल बाबर. उमदी : चन्नाप्पा होर्तीकर. बागणी : संभाजी कचरे, वैभव शिंदे, राजेंद्र पवार, स्वरूपराव पाटील, संतोष घनवट. अंकलखोप : दादासाहेब सूर्यवंशी. भिलवडी : संग्राम पाटील. चिकुर्डे : अभिजित पाटील.
खुले मतदारसंघ : सर्वसाधारण पुरुष : कवलापूर, उमदी, सावळज, जाडरबोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबे डिग्रज, डफळापूर, कोकरूड, बागणी, मणेराजुरी, कडेपूर, अंकलखोप, नागेवाडी.