जिल्हा परिषदेची माधवनगरच्या सरपंच, उपसरपंचास नोटीस
By admin | Published: April 20, 2016 11:50 PM2016-04-20T23:50:00+5:302016-04-20T23:50:00+5:30
बेकायदेशीर व्यवहार : एका सदस्यासही दणका
माधवनगर : माधवनगर (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमधील बोगस ठराव व बेकायदेशीर खरेदी व्यवहार व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी माधवनगरच्या सरपंच नंदाताई कदम, उपसरपंच सुनील जाधव व सदस्य शब्बीर मुल्ला यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे तिघांचे पद धोक्यात आले आहे. याबाबत सांगली सुधार समिती व माधवनगर स्वाभिमानी विकास आघाडीने तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस हा दणका दिला आहे.
माधवनगर गट नं. ५७ चे बिगरशेती न करता प्लॉटच्या खरेदी व्यवहारांच्या नोंद ग्रामपंचायत दप्तरी न. नं. ८ ला घेतल्या आहेत. तसेच जागा गावठाण हद्दीमध्ये नसताना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून महसूल संहितेचा भंग केला आहे. हा विषय सभेच्या नोटिसीत घेण्यात आला नाही. बेकायदेशीर दाखले देण्यात आले.
या नोंदी बेकायदेशीर व अनियमित आहेत. पदाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल बुडवून लोकांना भूखंड विकले आहेत. जाणीवपूर्णक लोकांची फसवणूक केली आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामसदस्य या नात्याने अवैध ठरावास जबाबदार आहेत. त्यामुळे सदस्य पदावरुन काढून टाकण्याची कारवाई का करण्यात येऊ नये, यासाठी विभागीय आयुक्तांकडे लेखी खुलासा सात दिवसात सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)
सुधार समिती, स्वाभिमानी आघाडीचा लढा
यापूर्वी पंचायत समितीने या प्रकरणाची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी मलमे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी सरपंच, उपसरपंच व सदस्यही जबाबदार असून, त्यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याचे कारण देत जिल्हा सुधार समिती व माधवनगर स्वाभिमानी विकास आघाडीने तक्रारी केल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही नोटीस देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे समितीने दिली. त्यावर अॅड़ अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, बाळासाहेब मगदूम, गोविंद परांजपे, अंकुश केरीपाळे, दत्तात्रय पाटील, विनायक पवार, अॅड़ राजाराम यमगर, आप्पा तिमगोळ, विजय सोडगे, बाळासाहेब मगदूम, निरंजन राजमाने, किरण पवार, दीपक कांबळे आदींची नावे आहेत.