झेडपीने दिले १८ आमदार, चार मंत्री

By Admin | Published: January 11, 2017 11:46 PM2017-01-11T23:46:18+5:302017-01-11T23:46:18+5:30

नेतृत्व पुरविणारी कार्यशाळा : आबांचा राज्याला लळा, तासगाव तालुक्याला सर्वाधिक संधी

The ZP gave 18 MLAs, four ministers | झेडपीने दिले १८ आमदार, चार मंत्री

झेडपीने दिले १८ आमदार, चार मंत्री

googlenewsNext



अशोक डोंबाळे ल्ल सांगली
ग्रामीण भागातून राज्याला नेतृत्व पुरवणाऱ्या कार्यशाळा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांनी भूमिका बजावली आहे. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये राजकारणाची सुरुवात करणाऱ्या अठराजणांना पुढे आमदारकीची संधी मिळाली, तर दोघे खासदार झाले. अठरा आमदारांपैकी चौघे मंत्री झाले. जिल्हा परिषदेतूनच पुढे आलेल्या आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अशी पदे भूषविली. विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख सध्या राज्य पातळीवर काम करत आहेत.
पंचायत राज निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, ‘या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतील. राज्याला व देशाला अनुभवी नेतृत्व पुरवणाऱ्या त्या कार्यशाळा ठरतील’. यातून पुढे अनेक नेते राजकारणात आले. अनेकजण आमदार व खासदार झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या राज्यातील प्रमुख नेतृत्वाचा भरभक्कम आधार बनले.
जिल्हा परिषदेतून आलेल्या आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. गृह आणि ग्रामस्वच्छता खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोनवेळा अध्यक्ष झाले. शिवाजीराव देशमुख सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत राहिले. विधान परिषदेचे सभापतीपद त्यांनी सांभाळले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
शिवाजीराव नाईक यांनी सलग अकरा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. पुढे ते आमदार झाले. शिवसेना-भाजप युतीच्या काळात ते राज्यमंत्रीही झाले. सध्या ते भाजपच्या चिन्हावर शिराळा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत काम करत आमदारकीपर्यंत मजल मारली.
भाजप-शिवसेना युतीच्या कालावधित कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेस आघाडी सरकारमध्ये तेही मंत्री झाले. इस्लामपूरचे एस. डी. पाटीलही खासदार होते. जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून प्रभावी काम केलेले माणिकराव पाटील यांनी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून वेगळा ठसा उमटविला.
याशिवाय बी. एस. कोरे, संपतरावनाना माने, विठ्ठलदाजी पाटील, दिनकरआबा पाटील, मोहनराव शिंदे-म्हैसाळकर, अप्पासाहेब बिरनाळे, शहाजीबापू पाटील, एस. टी. बामणे, अनिल बाबर, विलासराव शिंदे, संपतराव देशमुख, संजयकाका पाटील, विलासराव जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनाही जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर आमदारकीची संधी मिळाली. संजयकाका पाटील आता खासदार आहेत. महांकाली सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक नानासाहेब सगरे, जनार्दनकाका पाटील, धोंडिरामनाना पाटील, छगनबापू पाटील, अशोक शिंदे, बी. आर. शिंदे, विजयसिंह डफळे, बाबासाहेब मुळीक, आर. एस. पाटील, विठ्ठलअण्णा पाटील, शामराव कदम, पंडितराव जगदाळे, विजयअण्णा पाटील, वसंतराव पुदाले, रामरावदादा पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदींनी विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे.
अशी झाली सुरूवात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेस
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता. खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गाव, तालुका व जिल्हा स्तरावर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या. देशात पहिल्यांदा महाराष्ट्राने पुढाकार घेतला. १९६० पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अमलात आली. या व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली.
गांधी व यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले स्वप्न
ग्रामीण भागातून असे अनेक नेते पुढे आणण्याचे काम या संस्थांनी केले आहे. अधिकारी, पदाधिकारी व राज्य शासन यांच्यातील सुसंवादाला सुजाण नागरिकांच्या दक्ष यंत्रणेची जोड मिळाली, तर पंचायत राज व्यवस्था बळकट होऊ शकते. महात्मा गांधी व यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले ग्रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मोठी मदत मिळू शकते आणि त्यातून नेतृत्वही उभे राहू शकते, हे जिल्ह्याने दाखवून दिले आहे.
शिवाजीराव नाईक यांच्यामुळे देशपातळीवर नाव
१९७९ च्या निवडणुकीत शिराळा तालुक्यातून शिवाजीराव नाईक निवडून गेले. त्यावेळी वसंतदादांकडून बंद पाकिटातून अध्यक्षांचे नाव येत असे. नव्या अध्यक्षांसाठी छोट्या पिशवीतून पुष्पहार घेऊन गेलेल्या नाईक यांचेच नाव त्या बंद पाकिटातून आले. पुढे ते ११ वर्षे अध्यक्ष होते. देशपातळीवर त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे नाव गाजवले. १९८६ मध्ये जिल्हा परिषदेला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. याबद्दल २२ सप्टेंबर १९८६ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याहस्ते त्यांचा दिल्लीत गौरव झाला होता.
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या अठराजणांना पुढे आमदारकीची संधी मिळाली, तर दोघे खासदार झाले. चौघे मंत्री झाले. आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख यांनी जिल्हा परिषदेतून सुरुवात करताना राज्यातील अनेक महत्त्वाची मंत्रीपदे आणि पक्षीय पदे भूषविली व प्रभावी काम केले. कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे यांनीही पंचायत समिती, जिल्हा परिषद असा प्रवास करीत मंत्रीपदापर्यंत झेप घेतली. इस्लामपूरचे एस. डी. पाटीलही खासदार झाले होते. माणिकराव पाटील यांनी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून वेगळा ठसा उमटविला.

Web Title: The ZP gave 18 MLAs, four ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.