झेडपी पदाधिकाऱ्यांचे सोमवारी राजीनामे
By admin | Published: January 24, 2016 12:22 AM2016-01-24T00:22:25+5:302016-01-24T00:38:07+5:30
विलासराव शिंदे : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांचे एकमत
सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि चार समिती सभापतींचे राजीनामे घेण्यावर राष्ट्रवादी आणि भाजप व शिवसेनेतील नेत्यांचे एकमत झाले आहे. यामुळे सोमवारी अथवा बुधवारी पाच राजीनामे मंजूर करून निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे नाट्य गेल्या महिन्याभरपासून चालू आहे. आठवड्यापूर्वी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी घेतले आहेत. दोन दिवसात राजीनामे मंजूर करण्याचा निर्णयही झाला होता. परंतु, जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना व भाजपच्या नेत्यांचे समर्थकही सदस्य आहेत. या सदस्यांना राष्ट्रवादी सभापतिपदाची संधी देण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यावरूनच पाचही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर झाले नव्हते. शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यामध्ये इस्लामपूर येथे बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष व चार सभापतींचे राजीनामे घेण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
याबाबत शिंदे म्हणाले की, आ. जयंत पाटील यांच्याशी व अन्य नेत्यांशी चर्चा झाली आहे. यामध्ये पाच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सोमवारी अथवा बुधवारीपर्यंत मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पाचही पदाधिकाऱ्यांशी दोन दिवसात चर्चा करून राजीनामे मंजूर करण्यात येतील. लगेच नवीन पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. यामध्ये कोणतीही अडचण नाही. (प्रतिनिधी)
अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय लांबणीवर
पाच पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर नेत्यांचे एकमत झाले आहे. पण, अध्यक्षांचा राजीनामा पाच पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर लगेच घ्यायचा की वेळाने याबाबत ठोस निर्णय झाला नाही. यावर पुन्हा नेत्यांची बैठक घऊन राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.