झेडपी शाळांचे ‘मार्केटिंग’ गरजेच
By admin | Published: January 18, 2015 11:58 PM2015-01-18T23:58:44+5:302015-01-19T00:24:55+5:30
बोरसे-पाटील : शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशने
सांगली : जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असतानाही, त्याचे मार्केटिंग केले जात नाही. या शाळांकडे मुलांचा ओढा वाढण्यासाठी शाळांच्या गुणवत्तेची जाहिरातबाजी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेशाध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील यांनी केले.येथे आज (रविवार) प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरसे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर होते.बोरसे-पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत असताना, याचा गैरप्रचार होत आहे. शिक्षकांनीही कोणतीही तडजोड न करता दर्जेदार शिक्षण देण्यासासाठी कटिबध्द व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. विश्वनाथ मिरजकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत किरण गायकवाड यांनी केले. उदय शिंदे, रमेश साबळे आदींची भाषणे झाली. जिल्ह्यातील बारा महिला प्राथमिक शिक्षिकांचा व स्वच्छ व सुंदर शाळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण पाटील, शशिकांत भागवत, ताजुद्दीन मुलाणी, आप्पासाहेब जाधव, अरविंद पाटील उपस्थित होते.समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सयाजी रघुनाथ पाटील (शिगाव, ता. वाळवा) यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी बाबासाहेब पुंडलिक लाड यांची निवड करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्षपदी अंजली कमाने यांची निवड करण्यात आली. दोन्ही संघटनांची कार्यकारिणी पंधरा दिवसात जाहीर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिंधी)
थोरात गटाला हादरा
प्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनात सांगली जिल्ह्यातील संभाजी थोरात गटातील नऊ सदस्यांनी आज शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. राज्याचे अध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील व विश्वनाथ मिरजकर यांच्या उपस्थितीत थोरात गटातील सदस्यांनी प्रवेश केला. यामध्ये विजय चव्हाण, तुकाराम पवार, परशुराम चव्हाण, प्रमोद सुतार, नवनाथ पोळ, बालाजी मस्के, सचिन वाकडे, रेवणसिध्द होनमोरे, विशाल खाडे या शिक्षकांचा समावेश आहे.