जिल्ह्यात १ हजार ५३३ जण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 05:37 PM2022-01-20T17:37:43+5:302022-01-20T17:40:31+5:30
कोरोनाचा संसर्ग मागील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी करण्यात आलेल्या तपासण्यांमधून दीड हजारांच्या पुढे लोक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
प्रशासनाच्या वतीने बुधवारी ५ हजार ४८९ तपासण्या करण्यात आल्या होत्या, त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. या अहवालानुसार रुग्ण वाढीचा दर २७.९३ टक्के इतका वाढलेला आहे. रुग्ण वाढ सातत्याने होत आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण देखील आता वाढू लागले आहे.
कोरोनाचा संसर्ग मागील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. अजून तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्यामुळे दिलासा मिळत असला तरी जे लोक पूर्वीच्या आजाराने ग्रस्त आहेत तसेच जे लोक वयोवृद्ध आहेत, त्यांच्या जीविताला धोका असल्यामुळे बाधितांचा आकडा कमी होण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
प्रशासनाने निर्बंध लागू केले असले तरीदेखील रुग्ण वाढ होत आहे. शाळा, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय बंद ठेवले आहेत. तरीदेखील रुग्ण वाढ थांबत नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठा, मंडई, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने या ठिकाणी खरेदीसाठी अजूनही गर्दी होताना दिसते. बाजारात माल विक्रीसाठी येणाऱ्या लोकांचे लसीकरण अत्यावश्यक आहे, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी अजूनही स्थानिक स्वराज्य संस्था त्या प्रमाणात कारवाया करताना दिसत नाहीत.