चार ग्रामपंचायतींमध्ये १० लाखांचा अपहार
By admin | Published: July 1, 2016 10:53 PM2016-07-01T22:53:21+5:302016-07-01T23:38:13+5:30
परीक्षणात प्रकार उघडकीस : तत्कालीन ग्रामसेवकावर मेढा पोलिसांत गुन्हा नोंद
मेढा : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे, देवसरे, सोनाट व आचळी या गावांना मिळालेल्या शासनाच्या १० लाख ६ हजार ३२१ रुपयांच्या ग्रामनिधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक जगदीश नारायण साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी साळुंखेला अटक केली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी सिकंदर शेख यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जगदीश साळुंखे दि. ४ जुलै १९९९ ते ३१ मार्च २००५ या कालावधीत संबंधित गावांचे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत साळुंखेकडे येरणे ग्रामपंचायतीचा दि. १८ जुलै १९९९
ते ६ जुलै २००४, सोनाट ३ जुलै १९९९ ते ३१ मार्च २००५ कार्यभर होता. तसेच देवसरे व आचळी या ग्रामपंचायतींचाही कार्यभार होता.
या ग्रामपंचायतींना ग्रामनिधी प्राप्त झाला होता. या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचे लेखा परीक्षण स्थानिक लेखा निधी विभागाचे लेखा परीक्षण अधिकारी पी. बी. कुलकर्णी, उपमुख्य लेखा परीक्षक पवार, वाघमारे व सहकाऱ्यांनी केले. त्यावेळी या निधीच्या वाटपात अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. शासनाच्या ग्रामनिधीचा अपहार केल्याप्रकरणी जगदीश साळुंखेवर गुन्हा नोंद झाला आहे. मेढा पोलिसांनी अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक समाधान चवरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
दप्तर तपासणीसाठी दिले नाही...
नळपाणी पुरवठा योजना, जवाहर रोजगार योजना, गळती काढणे, मूल्यांकनाशिवाय खर्च आदींबाबात अपहार केल्याचे आढळून आले. संबंधित रकमेच्या पूर्ततेबाबत साळुंखेनी टाळाटाळ केली. तसेच दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.