आजीबाईबरोबर दहा महिन्यांच्या बाळानेही जिंकली ‘कोरोना’ची लढाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:43 PM2020-04-29T15:43:19+5:302020-04-29T17:28:33+5:30
गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करत, हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत आज
क-हाड : कोरोना हा कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, त्यावर वेळीच योग्य उपचार झाले व त्यास रुग्णाने चांगला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. क-हाडमध्येही ७८ वर्षीय आजीबाई अन् १० महिन्याच बाळ यांनीही कोरोना विरोधातील लढाई बुधवारी जिंकली.
येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ३ कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये सर्वात कमी वयाचा रुग्ण म्हणजे डेरवण येथील अवघे १० महिन्यांचे बाळ आणि सर्वात वयोवृद्ध रुग्ण म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. क-हाड) येथील ७८ वर्षीय महिला, ओगलेवाडी (ता. क-हाड) येथील २८ वर्षीय युवकाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सोबतीने कोरोनावर केलेली मात प्रेरणादायी असून, आजच्या या घटनेमुळे क-हाड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दि. ११ रोजी ओगलेवाडी येथील एक २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी म्हणजेच दि. १२ एप्रिलला डेरवण येथील एक १० महिन्यांचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खूपच हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच पुन्हा म्हारुगडेवाडी येथील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या, ७८ वर्षीय आईचा अहवाल दि. १५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तिघांवरही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
गत आठवड्यात कºहाड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या १० महिन्यांच्या बाळावर आणि ७८ वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते; पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोनविरुद्धचे हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत डॉक्टरांनी आजीबाई व बाळासह २८ वर्षीय युवकावरही यशस्वी उपचार केले.
बुधवारी या तिन्ही रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अन्य स्टाफच्यावतीने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या तिन्ही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ उपस्थित होता.