वाटाण्याला क्विंटलला १० हजार भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:28+5:302021-09-15T04:45:28+5:30

सातारा : अनेक भाजीपाल्यांचे दर कमी झाले असले तरी वाटाणा मात्र, चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत ...

10 thousand price per quintal for peas! | वाटाण्याला क्विंटलला १० हजार भाव!

वाटाण्याला क्विंटलला १० हजार भाव!

Next

सातारा : अनेक भाजीपाल्यांचे दर कमी झाले असले तरी वाटाणा मात्र, चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत भाव मिळू लागलाय. तसेच फ्लॉवरचाही दर वाढलाय. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी वाटाण्याचा दर ३ हजारापर्यंत खाली आला होता.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. मंगळवारी ३७५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची अवघी ७५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याला अजूनही दर कमीच मिळत आहे. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते ८० रुपये दर आला. टोमॅटोचा दर कमी झाला आहे. फ्लॉवरला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. फ्लॉवरचा भाव टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.

हिरव्या मिरचीला क्विंटलला ८०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिरचीच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे. तरीही भाजी मंडई, छोटे विक्रेते ४० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची विकत आहेत. आल्याला क्विंटलला २ हजार, तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून आले आणि लसणाच्या दरात फार फरक पडलेला नाही. त्याचबरोबर बटाटाही स्वस्तच आहे. सातारा बाजार समितीत बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये दर मिळत आहे. बटाट्याचा दर महिन्यापासून स्थिर आहे.

चौकट :

गवारला भाव कमी...

बाजार समितीत वांगी, टोमॅटो यांचे दर उतरलेले आहेत. तसेच गवारच्या दरावरही परिणाम झाला आहे. मंगळवारी तर गवारला १० किलोला अवघा २५० ते ३०० रुपये भाव आला. शेवगा शेंगला ३०० ते ४००, काकडीला १०० ते १५०, वाल घेवडा १५० ते २००, काळा घेवडा ३०० ते ४००, ढबू १०० ते १५०, भेंडी १५० ते २०० तसेच गाजरला १० किलोला २०० ते ३०० रुपये भाव आला.

.....................

बाजार समितीत भाज्यांचा भाव कमी झाला आहे. तरीही सध्या वाटाण्याला दर मिळतोय. त्यामुळे कुठेतरी समाधान वाटत आहे. तरीही वांगी, बटाटा, टोमॅटो, कांद्याचा दर वाढण्याची गरज आहे.

- सोपान पाटील, शेतकरी

.......................................................................

Web Title: 10 thousand price per quintal for peas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.