जिल्ह्यात १०० लाख क्विंटल साखरनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:42+5:302021-04-22T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार क्विंटल विक्रमी साखरेची निर्मिती केली आहे.
साखरनिर्मितीत जिल्ह्याने कोटीचे उड्डाण केले आहे. सर्वाधिक साखर उतारा सह्याद्री साखर कारखान्याला मिळाला असून, गाळपात जरंडेश्वर कारखान्याची आघाडी राहिली आहे. कोरोनाच्या महामारीतही साखर हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत सहा साखर कारखान्यांचे गळीत संपले आहे. यामध्ये श्रीराम साखर कारखाना-फलटण, बाळासाहेब देसाई कारखाना-पाटण, रयत साखर कारखाना-कऱ्हाड, ग्रीन पॉवर शुगर गोपूज-खटाव, स्वराज्य इंडिया अॅग्रो, खटाव-माण अॅॅग्रो प्रोसेसिंग-पडळ, या कारखान्यांचा समावेश आहे.
या गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होता; पण अनेक कारखान्यांची तोडणी व वाहतूक यंत्रणा विस्कळीत असूनही चांगल्या पद्धतीने गळीत यशस्वी केले आहे. सहकारी तीन व खासगी तीन कारखान्यांचे गळीत पूर्ण झाले आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत या सर्व कारखान्यांनी मिळून ९७ लाख ३८ हजार ७४४ टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार ९४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ११.२३ टक्के मिळाला आहे. यामध्ये खासगी कारखान्यांनी एकूण ५० लाख ९६ हजार १८७ टन उसाचे गाळप करून ५४ लाख १८ हजार ३४५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ४६ लाख ४२ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून ५५ लाख १८ हजार ५९५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. या वर्षी ऊस गाळपात कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगरने आघाडी घेत १४ लाख १९ हजार ६६० टन उसाचे गाळप करून १६ लाख २७ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केलेली आहे. तर, साखर उता-यात सह्याद्री साखर कारखान्याने आघाडी घेत १२.६५ टक्के उतारा मिळाला आहे.
(चौकट)
कारखानानिहाय ऊसगाळप कंसात साखरनिर्मिती (क्विंटल)
श्रीराम कारखाना : ४,५७,१४२ (५,३४,८७०)
कृष्णा कारखाना १२,००,६५० (१४,५०,३७०)
किसन वीर, वाई ४,१६,०६८ (३,८२,८००)
बाळासाहेब देसाई कारखाना २,३३,३२६ (२,७८,५७५)
सह्याद्री कारखाना ११,९७,००० (१५,१३,९८०)
अजिंक्यतारा कारखाना ६,५१,१४० (७,७२,९५०)
रयत अथणी शुगर ४,६०,१३१ (५,६८,०००)
खंडाळा कारखाना २७,१०० (१७,०५०)
दत्त इंडिया, साखरवाडी ४,५०,२०२ (५,३६,३२०)
जरंडेश्वर शुगर, कोरेगाव १४,१९,६६० (१६,२७,०००)
जयवंत शुगर, क-हाड ६,६८,५०५ (७,१८,९५०)
ग्रीन पॉवर शुगर गोपूज, खटाव ५,१४,०१२ (५,६७,१५०)
स्वराज्य इंडिया अॅग्रो, उपळवे ६,५२,४८० (५,६४,०७५)
शरयू अॅग्रो कापशी, फलटण ८,३१,४२७ (७,८६,१५०)
खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंग, पडळ ५,५९,९०० (६,१८,७००).