Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग
By नितीन काळेल | Published: August 27, 2024 12:27 PM2024-08-27T12:27:10+5:302024-08-27T12:27:50+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कण्हेर, धोम, उरमोडी धरणातूनही पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पाऊस कमी झाला होता. तर आॅगस्टच्या मध्यावर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. मात्र, मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. २९ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पाच दिवसांत तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर या भागात संततधार आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडीसह तारळी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.
मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३६ तर नवजाला १३९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तसेच महाबळेश्वरला १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सायंकाळपर्यंत धरणसाठा १०० टीएमसीचा टप्पा पार करु शकतो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ पासून कोयना धरणातील पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता. परिणामी कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धरणांमधून पुन्हा पाणी सोडले; नदीकाठी इशारा..
कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील व पुणे जिल्ह्यातील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणात आवक वाढल्याने वीरमधून नीरा नदीपात्रात ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
उरमोडी धरणातही पाणीसाठा वाढला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरवाजातूनही सुमारे सहा हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तर धरणाच्या वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. तर कण्हेर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. यामुळे दरवाजातून विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, नीरा, उरमोडी आणि वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.