सातारा आगारातील १०० गाड्या जागेवर उभ्या; तीस लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:21+5:302021-04-12T04:36:21+5:30

सातारा : राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. ...

100 vehicles parked at Satara depot; Thirty lakhs hit | सातारा आगारातील १०० गाड्या जागेवर उभ्या; तीस लाखांचा फटका

सातारा आगारातील १०० गाड्या जागेवर उभ्या; तीस लाखांचा फटका

Next

सातारा : राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. याला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शनिवार-रविवारी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एकही प्रवासी फिरकला नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील ११४ गाड्या जागेवर उभ्या होत्या. यामुळे सुमारे तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बाधितांची संख्या गतवर्षीपेक्षा मोठी असल्याने त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ''ब्रेक दि चैन'' आवाहन केले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार जमावबंदी, तर शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन म्हणून घोषित केला. या दोन दिवशी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले. यातून एसटीच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली. त्यामुळे प्रवासी आलेच तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांच्या मागणीचा विचार करून एसटीच्या फेऱ्या सोडण्यात नियोजन राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयात दोन दिवसांपासून सुरू होते. त्यासंदर्भात जिल्ह्यातील आगार व्यवस्थापकांना सूचनाही करण्यात आल्या होत्या. सातारा आगारातील अधिकारी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते. मात्र प्रवासी न फिरकल्याने दोन दिवस बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत होता. प्रवासी नसल्याने शनिवारी बसस्थानक स्वच्छ करण्यावर काहींनी भर दिला. मात्र या वीकेंड लॉकडाऊनचा तब्बल तीस लाखांहून अधिक रुपयांचा फटका आगाराला बसला आहे.

चौकट

एकूण बसेस संख्या - ११४

दोन दिवसांत धावल्या बसेस - ००

दोन दिवसांतील एकूण फेऱ्या - ००

दोन दिवसात मिळालेले उत्पन्न - ००

चौकट

दोन दिवसांत तीस लाखांचा फटका

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा मध्यवर्ती बसस्थानक हे पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कोकण, सांगली, बारामती, अहमदनगर या ठिकाणी जाण्याऱ्या गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ नेहमी असते.

साताऱ्यातून सातारा-स्वारगेट, सातारा-बोरिवली, सातारा-मुंबई या मार्गावर प्रामुख्याने मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक केली जाते. दर अर्ध्या तासाला किमान एक तरी गाडी या मार्गावर धावत असते. शनिवार-रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी सुटीसाठी गावी येत असतात. त्यामुळे शनिवार आणि रविवारी दोन दिवसात सरासरी तीस लाखांहून अधिक उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा होते. मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे प्रवासीच न आल्याने या दोन दिवसांत सातारा आगाराला तीस लाखांहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे.

चौकट

अधिकारी-कर्मचारी कामावर

शनिवार-रविवारी कडकडीत बंद काळात एसटीच्या प्रवासी वाहतुकीला सवलत देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी हे एकमेव साधन ठरते. अशावेळी आवश्‍यकतेनुसार फेऱ्या सोडण्याचे नियोजन झाले होते. त्यामुळे सातारा आगारातील चालक-वाहक तसेच तांत्रिक विभागातील कर्मचारी ठरलेल्या वेळेला कामाच्या ठिकाणी आले होते. आगारात सकाळी ठिकठिकाणी चालक-वाहक घोळक्याने एकमेकांशी गप्पा मारत बसल्याचे दिसत होते. मात्र एसटीच्या फेऱ्यात होऊ न शकल्याने हजेरी लावून ते निघून गेले.

एमपीएससीसाठी नियोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा रविवार, दि. ११ रोजी होणार होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यावे यासाठी सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून विशेष नियोजन करण्यात आले होते. मात्र ही परीक्षा पुढे गेली. तसेच इतर प्रवासी न आल्याने एसटीच्या फेऱ्या होऊ शकले नाहीत.

- रेश्मा गाडेकर,

आगार व्यवस्थापक, सातारा

Web Title: 100 vehicles parked at Satara depot; Thirty lakhs hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.