सातारा जिल्ह्यातील १०० गावांचं पाऊल प्लास्टिक कचरामुक्तीकडे
By नितीन काळेल | Published: December 11, 2023 07:05 PM2023-12-11T19:05:35+5:302023-12-11T19:06:02+5:30
जिल्हा परिषदेचा पुढाकार; गावांचं बकालपण जाणार
सातारा : कचरा न संपणारी गोष्ट आहे. शहराप्रमाणचे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने गावांना बकाल रुप येत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने १०० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करुन प्लास्टिकमुक्तीकडे पाऊल टाकले आहे. त्यामुळे भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.
कचरा हा आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी लागते. शहराच्या ठिकाणी घंटागाडीतून कचरा नेण्यात येतो. पण, प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहेच. कारण, शहरातील रस्त्यांच्या बाजुने पाहिले तर सर्वत्र प्लास्टिकच दिसून येते. तर ग्रामीण भागात ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही हेही वास्तव आहे. त्यातच प्लास्टिकने गावांना बकालरुप येत आहे. रस्ते असो किंवा ओढे, नाले, नद्या अशा ठिकाणी प्लास्टिक कचराच दिसतो. या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही. त्यामुळे गावांना बकालपण येत आहे. हे बकालपण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायतींना १५ वा वित्त आयोग तसेच विविध याेजनांतून निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचीही जबाबदारी लोकांना सुविधा पुरविण्याची आहे. त्यामुळे आता प्लास्टिक कचऱ्याची समस्या टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनाही एक पाऊल उचलावे लागत आहे. यासाठी ग्रामस्थांनी घरातील प्लास्टिक उंबऱ्या बाहेर येऊ नये यासाठी दक्षता घ्यायची आहे. घरातच प्लास्टिक गोळा करुन ठेवायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदातरी घरातील प्लास्टिक जमा करणे आवश्यक आहे.
नंतर या प्लास्टिक कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करुन ते पुन्हा वापरात कसे येईल, हे पाहिले जाणार आहे. अशाप्रकारे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यात १०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे गावातील प्लास्टिक कचऱ्यांचे ढिगारे कमी होणार आहेत. तसेच कोठेही प्लास्टिक दिसणार नाही. त्यामुळे गावाचे बकालपणही जाण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतींची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.
यावर चालणार काम..
प्लास्टिक मुक्तीसाठी १०० ग्रामपंचायतींची निवड झालेली आहे. यामध्ये त्रिसुत्रीचा वापर केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचा पुन्हा वापर करणे आणि प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया ही त्रिसुत्री राहणार आहे.
आपले गाव स्वच्छ आणि सुंदर असणे महत्वाचे असते. यासाठी कचरामुक्त गाव ठेवण्याची गरज आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे तर गावांचे साैंदर्य हरवतं. यासाठी प्लास्टिक कचरा उघड्यावर पडू नये यासाठी जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामस्थांनी प्लास्टिक घरात गोळा करायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायती प्लास्टिक जमा करुन ते पुढील पुर्नप्रक्रियेससाठी पाठवतील. यामुळे गावे कचरामुक्त होतील. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग