टॉपवरील साताऱ्यात मेमध्ये १० हजार नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:43+5:302021-05-29T04:28:43+5:30
सातारा : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दररोज हजारोंच्या घरात वाढतच चालला आहे. मे महिन्यातील २७ ...
सातारा : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दररोज हजारोंच्या घरात वाढतच चालला आहे. मे महिन्यातील २७ दिवसांत बाधितांत एक क्रमांकावर असणाऱ्या सातारा तालुक्यात तब्बल १० हजारांवर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर फलटण तालुक्यात साडेनऊ हजार आणि खटाव तालुक्यात सहा हजार रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला; पण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर एप्रिल महिन्यापासून हजारात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे एका-एका दिवसात अडीच हजारांवरही बाधित संख्या गेली. परिणामी सस्य:स्थितीत एकूण रुग्णसंख्या दीड लाखावर गेली आहे.
जिल्ह्यात सध्या सातारा तालुका कोरोनाबाधित आणि मृतांत आघाडीवर आहे. सातारा तालुक्यात आतापर्यंत ३४१८० रुग्ण सापडले आहेत. यामधील १००५८ बाधित हे मे महिन्यातील २७ दिवसांत सापडले आहेत, तर मे मध्येच तब्बल २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर फलटण तालुक्यात बाधित वाढले आहेत. सद्य:स्थितीत फलटणमधील रुग्णसंख्या २३०५८ झाली असून, यामधील ९६९७ हे मे महिन्यातील आहे, तर खटाव तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १४९०८ झाली आहे. ५९६७ बाधित हे मेमधील आहेत.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत कऱ्हाड तालुक्यात एकूण रुग्णसंख्या २१५३७ झाली असून, माणमध्ये १०७५३, कोरेगाव १३६४१, पाटण ६४३५, वाई ११२९७, जावळी तालुक्यात ७२६४, महाबळेश्वरमध्ये ३९२६ आणि खंडाळा तालुक्यात १००१७ रुग्ण आढळले आहेत.
चौकट :
मे महिन्यातील रुग्ण आणि मृत तालुकानिहाय असे :
तालुका रुग्ण मृत
सातारा १००५८ २५५
कऱ्हाड ५५८४ १८२
फलटण ९६९७ ५७
माण ४२५४ ६०
खटाव ५९३७ १४६
कोरेगाव ४७८८ ७३
पाटण २१३५ ३६
वाई ३२९३ १०४
जावळी २३२३ ६०
महाबळेश्वर ६३२ १०
खंडाळा ३५४३ ४९
इतर ५५२ ०००
................................................................