साताऱ्यात वाटाण्याला क्विंटलला १० हजार दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:21+5:302021-06-28T04:26:21+5:30
सातारा : जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अजूनही वाढलेलेच असून, सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव मिळाला. तर ...
सातारा : जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अजूनही वाढलेलेच असून, सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव मिळाला. तर किरकोळ विक्री १४० रुपये किलापर्यंत गेली आहे. दरम्यान, खाद्यतेल डब्याचा दर जैसे थे असून, पाऊचमागे ५ ते १० रुपये उतार आलेला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ६४८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांद्याची अधिक आवक झाली नसली तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळाला तर वांग्याचाही दर वाढल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ७० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला दीड हजार रुपये तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. आठवड्यात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झालेली आहे.
खाद्यतेल बाजारभाव...
मागील तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,४००पर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा १,८०० ते १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,४५० आणि सोयाबीनचा २,१५० ते २,२०० रुपयांपर्यंत मिळत आहे. सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १४० रुपये, सूर्यफूलचा पाऊच १७० रुपयांना मिळत आहे.
डाळिंबाची आवक
बाजार समितीत आंब्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे तर डाळिंब आणि पपई आली होती. डाळिंबाची १२ व पपईची १८ क्विंटलची आवक झाली.
बटाटा अजून स्वस्त...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला ५०० ते ५५० रुपये, ढबू ३०० ते ३५० रुपये, शेवगा शेंग व पावटा ६०० ते ७०० रुपये, गवारला ३५० ते ४०० रुपये दर १० किलोला मिळाला.
प्रतिक्रिया...
मागील काही महिन्यांपासून खाद्यतेल दरात वाढ झालेली. पण, सध्या अमेरिकेत बायोडिझेलला तेल वापर कमी झाला आहे. त्यामुळे खाद्यतेल बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे दर उतरला
- संभाजी आगुंडे,
विक्री प्रतिनिधी
मागील १५ दिवसांपासून पालेभाज्याचे दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या पुढे आहे. वाटाणा तर १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचा भाज्यावरच अधिक खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.
- शांताराम यादव, ग्राहक
सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळाला. यामुळे समाधान वाटत आहे. त्याचबरोबर कांद्याला दर अजुन कमी आहे. इतर भाज्यांना चांगला दर मिळू लागला आहे.
- रामभाऊ पवार, शेतकरी
.................................................................................................................................................................