साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:48 PM2022-12-10T15:48:44+5:302022-12-10T15:49:10+5:30

कास धरणातून सातारकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार

102 crore work sanctioned for new water supply channel from Kas Dam, The claim of Udayanaraje Bhosale and Shivendrasimharaje Bhosale | साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

साताऱ्यातील कासच्या पाण्याला श्रेयवादाची उसळी, १०२ कोटींच्या कामास मंजुरी; निधीवरून दोन्ही राजेंचा दावा 

Next

सातारा : कास धरणातून सातारकरांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. सुमारे १०२ कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, आता खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही निधी आणल्याचा दावा केला आहे. यामुळे कासच्या पाण्यावरून श्रेयवाद उफाळणार असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेतून तांत्रिक मान्यता घेऊन, सादर केलेल्या कास धरण ते पॉवर हाऊसपर्यंत अतिरिक्त गुरुत्व नलिका टाकण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. १०२ कोटी ५६ लाखांच्या कामास मंजुरी मिळाल्याने कामाची सुरुवात करण्यात येईल. कास धरणाची उंची वाढवण्यात आल्याने पूर्वीच्या पाचपट म्हणजेच ५०२ दशलक्ष घनफूट पाणपातळी झाली आहे.

पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला म्हणूनच नगरपरिषदेने तातडीने सध्याच्या जलवाहिनी व्यतिरिक्त आणखी एक वाहिनी कास धरणापासून टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन योजनेला मान्यतेची मागणी केली होती. त्यानुसार कास धरण ते पॉवर हाऊस अशी २७ किलोमीटरची नवीन अतिरिक्त जलवाहिनी टाकण्यासह, १६ एमएलडी क्षमतेचा फिल्टरेशन प्लँट तसेच १० लाख लिटर्स क्षमतेची पॉवर हाऊस येथे नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येईल. नवीन जलवाहिनी पूर्ण झाल्यावर एकूण ४४ एमएलडी शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.

नवीन अतिरिक्त जलवाहिनीच्या १०२ कोटी ५५ लाख खर्चापैकी सुमारे ३४ कोटी केंद्र शासन तर राज्य शासन ५३ कोटी देणार आहे. सातारा नगरपरिषदेचा सुमारे १५ कोटी रुपयांचा लोकवर्गणीचा सहभाग असणार आहे, असेही खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कास धरणाची उंची वाढवल्यानंतर सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कास ते सातारा अशी नवीन मोठ्या क्षमतेची जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र व इतर तत्सम बाबी करणे आवश्यक होते. या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून १०२.५६ कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीमध्ये ५२.९९ कोटी निधी हा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मंजूर १०२.५६ कोटी निधीतून कास धरण ते सातारा अशी नवीन वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे, मार्गावर येणाऱ्या ओढ्या नाल्यांवर आरसीसी बांधकाम करून पाणी पुढे नेणे, सांबारवाडी येथे वाढीव क्षमतेचे जलशुद्धीकरण बांधणे, अशी विविध कामे होणार आहेत. राज्य शासनाच्या भरीव निधीमुळे केंद्र शासनाने अमृत अभियानातून पाणीपुरवठा प्रकल्पासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाच्या मोलाच्या आर्थिक साहाय्यामुळे कास धरणाचे मुबलक पाणी सातारकरांना मिळणार आहे.

दोन्ही राजेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार..

कासच्या नवीन पाणी योजना प्रकल्पाच्या १०२ कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंत आता श्रेयवादाची लढाई सुरू होणार आहे. विशेष म्हणजे दोघांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

उदयनराजेंनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सहकार्य लाभल्याचे स्पष्ट केले आहे. तर शिवेंद्रसिंहराजेंनीही सातारकरांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Web Title: 102 crore work sanctioned for new water supply channel from Kas Dam, The claim of Udayanaraje Bhosale and Shivendrasimharaje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.