कोयनेत १०५ टीएमसी पाण्याची आवक, पूर्व भागात उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:42 PM2020-08-27T14:42:11+5:302020-08-27T14:44:28+5:30
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे पाऊस झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उघडीप आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात अपवादात्मक स्थितीत किरकोळ स्वरुपात पाऊस होत आहे. तर पूर्व दुष्काळी भागात पावसाची उघडीप कायम आहे. साताऱ्यातही तीन दिवसांपासून सूर्यदर्शन घडत आहे.
पश्चिम भागात पाऊस नसल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. परिणामी धरणाचे दरवाजे तसेच पायथा वीजगृहातील विसर्गही बंद आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ९७.६१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर टक्केवारी ९२.७४ होती. तर कोयनानगरला सकाळपर्यंत ५ आणि यावर्षी आतापर्यंत ४०४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे ११ आणि यावर्षी ४६१६ आणि महाबळेश्वरला जूनपासून ४४७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कोयना धरणात यावर्षी जूनपासून आतापर्यंत १०५ टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. तर धरणातील साठा वाढत असताना पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे १० फुटांपर्यंत वर उचलून विसर्ग सुरू होता. तसेच पायथा वीज गृहातूनही पाणी सुरु होते. सध्या आवक कमी झाल्याने पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे.