स्वच्छ अन् टापटीप गणवेशात आले १०६ विद्यार्थी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:10 PM2018-10-08T23:10:46+5:302018-10-08T23:32:19+5:30
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा,
सातारा : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम आयोजित केला. पहिल्याच दिवशी सोमवारी पहिलीतील १०६ विद्यार्थी टापटीप गणवेशात वर्गात आले होते.
रयत शिक्षण संस्था यंदा शताब्दी वर्ष साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने वर्षभर विविध विधायक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, पालकांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.
मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे म्हणाले, ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये परिपूर्ण गणवेश, वर्ग सजावट, परिसर स्वच्छता, बागेची निगा राखणे यावर भर दिला जात आहे. यासाठी जून महिन्यापासूनच तयारी करण्यात आली. यासाठी वाक्यपट्ट्या, शब्दपट्ट्या तयार करण्यात आल्या. व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, होणार आजार याबाबत जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.’
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी, त्यांना वेळेचे महत्त्व पटावे यासाठी पालकसभा घेऊन जनजागृती करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत स्थापनेपासून आत्तापर्यंत झालेला बदल याची ध्वनीचित्रफीत दाखविली. पहिल्याच दिवशी सोमवार, दि. ८ रोजी पहिलीतील १०६ विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आली होती. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. अजित पाटील, धैर्यशील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे, पर्यवेक्षक संजय घाडगे, दीपक महापरळे, वर्गशिक्षिका वर्षा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी
गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना लसीकरण, डिसेंबर-जानेवारी महिन्यात आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना थेट बांधावर नेऊन शेतीविषयी माहिती देणे हे उपक्रम राबविले जात आहे. गेल्या वर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला. तेव्हा फटाक्यातून पैसे वाचवून अनाथ मुलांना जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. हाच उपक्रम यंदाही राबविला जाणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला असला तरी तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस फायदा होणार आहे.
- प्रमोद वायदंडे, मुख्याध्यापक
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सोमवारी पहिलीतील विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आले होते.