१०८ रुग्णवाहिकेमुळे साताऱ्यात महिन्यात वाचविले तीन हजार रुग्णांचे प्राण

By दीपक शिंदे | Published: October 30, 2023 05:57 PM2023-10-30T17:57:52+5:302023-10-30T17:58:42+5:30

जीव धोक्यात घालून वेळेत पोहोचवले रुग्णालयात

108 ambulances saved the lives of 3000 patients in Satara in a month | १०८ रुग्णवाहिकेमुळे साताऱ्यात महिन्यात वाचविले तीन हजार रुग्णांचे प्राण

१०८ रुग्णवाहिकेमुळे साताऱ्यात महिन्यात वाचविले तीन हजार रुग्णांचे प्राण

सातारा : जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे अपघात, हदयविकार, आत्महत्येचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर त्यांचे जीव वाचतात. अशाच प्रकारे १०८ रुग्णवाहिकेला केवळ एका महिन्यात ३ हजार १६० रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. १०८ ही रुग्णांच्या आयुष्याची लाइफ लाइन ठरल्याने रुग्णवाहिकेवरील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे प्रशासनाकडून काैतुक करण्यात आले.

जिल्ह्यात दररोज अनेक अपघात होत असतात. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले तर त्यांचा जीव नक्कीच वाचतो. तसेच हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही तातडीने प्राथमिक उपचार मिळणे गरजेचे असते. सर्वाधिक रुग्ण हे या दोन प्रकारातील असतात. यासह अन्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेने वेळेत पोहोचवून जीवदान दिले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात १०८ रुग्णवाहिका पोहोचत आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना या रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना नेण्यासाठी काहीजण खासगी वाहनाचा वापर करतात. मात्र, अशी वाहने तोंडाला येईल ते भाडे सांगून अक्षरशः

सर्वसामान्यांची आर्थिक लूट करतात. यामुळे खासगी वाहनाने रुग्णांना पूर्वीसारखे दवाखान्यात दाखल केले जात नाही. कुठेही रुग्ण अत्यवस्थ असला तर १०८ रुग्णवाहिकेला फोन करून लोक बोलावून घेतात. याचे कारण १०८ रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन अत्यंत वेगवान आणि ताळमेळ बसणारे आहे. गाडी कधी येईल, हे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांना धीर दिला जातो. जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकेने केवळ एका महिन्यात तीन हजार रुग्णांना जीवदान दिल्याने याची जिल्हा प्रशासनानेही दखल घेतली. सर्व डाॅक्टर कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने काैतुक केले. आणखी काही सुविधा लागत असतील तर त्या सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासनही रुग्णवाहिका व्यवस्थापनाला देण्यात आले.

नागमोडी वळणे तरीही सुसाट..

ग्रामीण भागातील डोंगराळ वस्ती, रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट, अरूंद आणि नागमोडी वळणे असतानाही १०८ रुग्णवाहिकेने जलदसेवा देऊन रुग्णांचे जीव वाचविले

Web Title: 108 ambulances saved the lives of 3000 patients in Satara in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.