दहावीचे पेपर सापडले; पण बारावीचं काय?
By admin | Published: March 6, 2015 11:38 PM2015-03-06T23:38:11+5:302015-03-06T23:44:19+5:30
उत्तरपत्रिका गहाळ : सिध्देश्वर कुरोलीच्या मठात गठ्ठे सादर; मात्र कऱ्हाड तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
कऱ्हाड/ औंध : कऱ्हाड येथून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्याची चर्चा सुरू आहे. आठ दिवस उलटूनही उत्तरपत्रिका सापडायला तयार नाहीत. शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. पण यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचे किस्सेही चर्चिले जात आहेत. यापूर्वी पेपर जळाले, गिळाले अन् आता गहाळ झाले खरे; पण यातून कोणी काही बोध घेणार का? हा प्रश्न पडलाय. दरम्यान, खटाव तालुक्यात बोर्डाचे दहावीचे पेपरचे गठ्ठे रस्त्यात पडले. ते सिध्देश्वर कुरोलीच्या मठात सादर करण्यात आले. पण, कऱ्हाडमधील उत्तरपत्रिकेचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थी दशेतील एक ‘टर्निंग पॉइंट’; पण कऱ्हाडातून भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे पाचशे उत्तरपत्रिका गायब झाल्याची घटना घडल्याने ‘त्या’ पाचशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आता काय ‘टर्न’ मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग सध्या कागदी घोडे नाचवत आहे. तर टपाल खाते हात झटकण्याचा प्रयत्न करतंय; पण या घटनेमुळे ज्या पाचशे विद्यार्थ्यांचे हात आता निकालाखाली अडकलेत त्यांचा विचार कोण करणार ?
उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची सध्या शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार, हे सध्या सांगता येत नाही; पण यापूर्वी जे घडलं तेच याही प्रकरणात होईल, असे म्हटले जातेय.
सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी विद्यापीठातून बी. ए. चे पेपर जळाल्याचे सांगितले जाते. यावर मार्ग म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा न घेता, साऱ्यांनाच पास करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हाती बी. ए. ची पदवी मिळाली खरी; पण त्यांना ‘जळकी बी. ए.’ अशी ओळख मिळाल्याचे जुने लोक सांगतात. त्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात एका शिक्षकाकडे उत्तरपत्रिका तपासायला गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यातील काही उत्तरपत्रिका गाईने खाल्ल्या. ही घटना त्यांनी संबंधितांना कळविली. आता गाईवर काही गुन्हा नोंद करता येत नाही. मग त्यावेळी मध्यमार्ग काढण्यात आला, अन् विद्यार्थी पास झाले. सध्या कऱ्हाडातून बारावीच्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. त्या जर सापडल्या नाहीत तर ? मग मागे घडले तसेच होणार. ते पाचशे विद्यार्थीही कदाचित पास होतील; पण सध्याच्या गुणवत्तेच्या स्पर्धेत त्यांना तो निकाल परवडणारा असेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदाही होईल, अन् एखाद्या हुशार विद्यार्थ्याला तोटाही होईल; मग त्याचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? कारण सध्या तर कोणीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. (प्रतिनिधी)