परीक्षेविना दहावीची पोरं पास, ऑनलाईन निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 06:24 PM2021-07-16T18:24:52+5:302021-07-16T18:26:59+5:30
Ssc Result Satara : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले.
सातारा : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले. वर्ग न भरता, परीक्षा न देता उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविला; परंतु शिक्षण मंडळाची वेबसाईट बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.
राज्य शिक्षण मंडळामार्फत दि. २९ एप्रिल ते २३ मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारित जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना दि. २३ जून ते ३ जुलै अशी मुदत देण्यात आली होती.
शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवला. नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन याच्याआधारे विषयनिहाय निकालासाठी गुणदान करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना दहावीचे अंतिम गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील दहावीच्या ४० हजार १६६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ४० हजार १६५ विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारित गुण देण्यात आले. यापैकी ४० हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेत निकालाची प्रिंट काढण्यासाठी गर्दी केली.
अनेकांनी राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळावर मोबाईलच्या माध्यमातून निकाल पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु निकालाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ सुरू झाले नव्हते.
निकाल म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारची हुरहूर असायची. भीती व आनंदही असायचा. यंदा असे चित्र पाहायला मिळाले नाही. यंदा ना वर्ग भरले ना दहावीची परीक्षा झाली. पास होण्याची खात्री असल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच आनंद साजरा केला.
कोल्हापूर विभागात सातारा दुसरा
कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. यामध्ये सांगली ९९.९४, सातारा ९९.९२, तर कोल्हापूर ९९.९० टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी आहे.
सातारा जिल्ह्याचा लेखाजोखा
- माध्यमिक शाळा ७२६
- नियमित विद्यार्थी नोंदणी ४०१६६
- मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी ४०१६५
- उत्तीर्ण विद्यार्थी ४०१३४
- उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९२
- पुन:प्रविष्ट विद्यार्थी (रिपिटर)
- नोंदणी १५०१
- मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी १५०१
- उत्तीर्ण विद्यार्थी १४०४
- उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५३