जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला ११ कोटींचा गंडा, बॅंकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:31 AM2023-01-24T11:31:54+5:302023-01-24T11:33:29+5:30
सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले
सातारा : तीन कोटींचे कर्ज असलेल्या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला सहभागी करून त्याची ११ कोटी ३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात साहेबराव देशमुख काॅ-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन आणि विद्यमान चेअरमन तसेच मूळ शेतकरी विजय शिंदे यांच्यासह १९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, विद्यमान चेअरमन बिपीन कुरतडकर, वसुली अधिकारी खामकर, जनरल मॅनेजर अनिल कदम, साकीनाका शाखेचे मॅनेजर हणमंत बोडके, विठ्ठल चिकणे, अरविंद धनवडे, साधना जाधव, सुनीता जुनघरे, बिना मेहता, विशाल शहा, विजय शिंदे, राजेश्वर कासार अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय चंद्रकांत मोरे (वय ६३, रा. माेतीबाग, वाई, जि.सातारा) हे उद्योजक आहेत. त्यांची औरंगाबाद येथे मोरे स्पोर्ट्स इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. तसेच वाई येथेही साई पर्न शिट नावाची कंपनी आहे. विजय शिंदे यांच्या मालकीची खिंडवाडी ( सातारा ) येथे १०.५ एकर एन. ए. जागा आहे. यावर साहेबराव को ऑपरेटिव्ह बँकेचे ३ कोटींचे कर्ज होते. हे कर्ज थकीत असल्याने बँकेचे अधिकारी उद्योजक संजय मोरे यांच्याकडे औरंगाबाद येथे गेले. त्यांनी ही जागा विकत घेण्यासाठी लिलाव प्रक्रियेत मोरेंना सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार ते सहभागी झाले.
मूळ मालक विजय शिंदे याने त्या जमिनीवर ७५ प्लॉट केले होते. त्यापैकी ६ प्लॉट विकण्याची परवानगी बँकेने परस्पर दिली. सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले. यामध्ये साहेबराव देशमुख को - ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्वांनी मे. क्रिस्टल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी कंपनी स्थापन केली होती. प्लॉटच्या विक्रीनंतर या कंपनीची सातबारावरील नोंद तलाठ्यांना अर्ज देऊन रद्द केली आहे.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मूळ शेती मालक विजय शिंदे आणि बँकेने आपली फसगत केल्याचे मोरे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी आपली ११ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लिलावासाठी असे उभे केले पैसे
संजय मोरे यांनी विविध बँकांचे कर्जे काढून लिलावाचे ८ कोटी ३ लाख ६२ हजार रुपये भरले. तसेच इतर व्यवहारासाठी औरंगाबाद येथील तापडीया टेरेस अदालत रोड येथील मोरे यांचे मित्र दिनेश दरक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या पाच दुकान गाळ्यांवर प्रत्येकी ४० लाखांचे कर्ज काढून २ कोटी रुपये उभे केले. नोंदणीसाठी १ कोटी रुपयांचा खर्च आला. असे एकूण ११ कोटी या व्यवहारापोटी त्यांनी खर्च केले.