पशुगणनेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, सातारा जिल्ह्यात किती जनावरे.. जाणून घ्या
By नितीन काळेल | Updated: March 31, 2025 19:41 IST2025-03-31T19:41:05+5:302025-03-31T19:41:22+5:30
सातारा : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत १ हजार ९०० गावात मोहीम पूर्ण झाली आहे, तर ८८ गावांतील ...

पशुगणनेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, सातारा जिल्ह्यात किती जनावरे.. जाणून घ्या
सातारा : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत १ हजार ९०० गावात मोहीम पूर्ण झाली आहे, तर ८८ गावांतील गणना बाकी आहे. तरीही पशुगणनेसाठी केंद्र शासनाने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गणना वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ११ लाख पशुधनाची नोंद झाली आहे.
केंद्र शासनाच्यावतीने दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना होत आहे. यामध्ये १६ प्रजातींची नोंद करण्यात येत आहे. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर आदी पशुधन तसेच कोंबड्यांचीही गणना केली जात आहे.
यातील काही पशूंची मात्र, प्रथमच गणना होत आहे. त्यातच शासनाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी अशी पशुगणना करण्यात येणार होती; पण, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पशुगणनेला सुरुवात झाली. परिणामी, या मोहिमेला उशीर झाला. तसेच एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली होती. ३१ मार्चअखेर ही मुदत होती. पण, देशातील अनेक राज्यात पशुगणना धीम्या गतीने असल्याने पुन्हा मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत पशुगणना पूर्ण करावी लागणार आहे.