रस्त्याचे डांबरीकरण न करताच ठेकेदाराला ११ लाखांचे बिल, सातारा जिल्हा परिषदेचा गलथान कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:07 PM2022-11-18T13:07:38+5:302022-11-18T13:28:16+5:30
ठेकेदाराने प्रत्यक्षात डांबरीकरण आणि खडीकरणाचे कोणतेही काम केले नाही.
सातारा : रोहोट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणऱ्या जांभळेघर वस्ती ते घाटाई यादरम्यानच्या अडीच किलोमीटर रस्त्याचे ठेकेदाराने डांबरीकरण आणि खडीकरण न करताच परस्पर ११ लाख रुपयांचे बिल काढले आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते बोलत होते. यावेळी स्वाती शेडगे, शहर संघटक प्रणव सावंत, आनंद कोकरे, अजय सावंत, प्रदीप सुतार, किरण कोकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख मोहिते म्हणाले, ‘२०१८ ते २० या वर्षात रोहोट, ता. सातारा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जांभळेघर वस्ती ते घाटाई या दरम्यानच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्याला तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांच्या निधीतून ७ लाख आणि अन्य एका योजने अंतर्गत ४ असे एकूण ११ लाख रुपये मंजूर झाले होते. या कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने प्रत्यक्षात डांबरीकरण आणि खडीकरणाचे कोणतेही काम केले नाही.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे रस्ता चोरीला गेला आहे. यासंबंधी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व अभियंत्यांना निलंबित करावे. अन्यथा ८ दिवसानंतर सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या आवारात संसरोपयोगी साहित्यांसह ठिय्या देतील, असा इशाराही मोहिते यांनी दिला आहे.
फक्त माती टाकून सपाटीकरण...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केल्यावर कटिंगमध्ये पैसे खर्च झाल्याचे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. तसेच संबंधित ठेकेदाराने केवळ गावाच्या रस्त्यावर पोकलेन मशीन आणून उभे केले. हे मशीन १५ दिवस बंद होते. केवळ ७ दिवस या मशीनने माती उचलून रस्त्यावर टाकून सपाटीकरण करणे एवढेच काम केले आहे. हे काम केवळ एक लाख रुपयांचे असताना ठेकेदाराला काम न करताच या कामाचे ११ लाख रुपयांचे बिल देण्यात आले आहे, असा आरोपही सचिन मोहिते यांनी केला आहे.