शेअर्सची माहिती देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील डाॅक्टरला ११ लाखांना गंडा, तिघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: February 13, 2024 05:54 PM2024-02-13T17:54:43+5:302024-02-13T17:55:07+5:30
सातारा : शेअर्सची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने डाॅ. कपील जयवंत ठोकपे (वय ३६, रा. मनोकमल, सदर बझार, ...
सातारा : शेअर्सची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने डाॅ. कपील जयवंत ठोकपे (वय ३६, रा. मनोकमल, सदर बझार, सातारा) यांची तब्बल ११ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाणी मिश्रा, आर्यन रेड्डी, वैष्णवी एंटरप्रायजेस, रवीकपूर (रा. फरीदाबाद, उत्तर प्रदेश), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डाॅ. कपील ठोकपे यांना वरील संशयितांनी एका व्हाॅट्सअँप ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. या ग्रुपमधून कोणता शेअर्स विकत घ्यायचा, कोणता विक्री करायचा याची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळतो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर संशयितांनी डाॅ. ठोकपे यांना एक लिंक पाठवून अकाउंट काढण्यास सांगितले. त्यामधून रिटेल होम या नावाचे अॅप्लिकेशन इन्सस्टाॅल अकाउंट काढण्यास सांगितले.
त्यामध्ये डाॅ. ठोकपे यांनी सुरुवातीला १७ जानेवारी २०२४ रोजी १ लाख रुपये पाठवले. त्यानंतर २४ जानेवारी रोजी आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये असे एकूण ११ लाख रुपये वैष्णवी एंटरप्रायजेस यांच्या फरीदाबाद शाखेमध्ये पाठविले. त्यानंतर काही दिवसांतच संशयितांनी डाॅ. ठोकपे यांचे अँप्लिकेशनमधून लाॅगीन बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डाॅ. ठोकपे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी दि. १२ रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप हे अधिक तपास करीत आहेत.