१११ निराधारांवर निवृत्तीवेतनाची ‘सावली’!
By admin | Published: March 23, 2015 09:15 PM2015-03-23T21:15:39+5:302015-03-24T00:17:20+5:30
गुढीपाडव्याचा मुहूर्त : गोरगरिबांना दरमहा देणार पाचशे
कातरखटाव : येथील सावली सांस्कृ तिक, शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था कातरखटाव यांच्याकडून ज्याला खरंच कुणाचा आधार नाही, अशा १११ निराधार गरीब महिला, पुरुषांना दरमहा पाचशे रुपयांची निराधार योजना सुरू करण्यात आली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीशेठ बागल यांनी समाजाची बांधिलकी जोपासण्याचे चांगले कार्य हाती घेतले आहे. आपण सामाजाचे काही तरी देणे आहोत, अशी मनात आशा बाळगून बागल यांनी गोरगरिबांच्या हितासाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमाचे अतिथी कदम महाराज कदमवाडीकर यांच्या हस्ते प्रथम पाच लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. नंतर उर्वरित लाभार्थ्यांना संस्थेतील इतर सभासदांकडून वाटप करण्यात आले. तानाजीशेठ बागल यांची समाजासाठी असलेली तळमळ पाहून लाभार्थी भारावून गेले होते.
कातरखटाव गावात त्यांनी आत्तापर्यंत ज्यांना खरंच राहण्याची सोय नाही, जागा आहे; पण आपलं स्वत:चं घर बांधता येत नाही, अशा बेघर तीन लाभार्थ्यांना घरे बांधून दिली आहेत.
ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती हालाकीची आहे व त्याची शिकायची फार इच्छा आहे, अशा विद्यार्थांचा खर्च स्वत: करणार आहेत. यावेळी तानाजीशेठ बागल व त्यांच्या पत्नी सुजन बागल या दोघांचा यावेळी गावचे सुपुत्र म्हणून संस्थेच्या सभासदांनी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार केला. एकंदरीत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या पेन्शन सोहळ्यास गावातील व परिसरातील लोकांची गर्दी दिसून येत होती. तानाजीशेठ बागल यांच्या पेन्शन योजनेस परिसरातून. चांगल्यारीतीने प्रतिसाद मिळत आहे. महिला व ज्येष्ठ नागरीकांमधून या योजनेचे कौतुक केले जात आहे. यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत पाटील, सुजित बागल, बाबू काशीद, सरपंच राजेंद्र बागल, बाबूराव बागल,आसिफ मुल्ला, हिंदुराव बोडके, छगन बागल कार्यकर्ते, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता. (वार्ताहर)
गोरगरिबांसाठी असेच नेहमी सामाजिक कार्य करीत राहणार, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहणार .
-तानाजीशेठ बागल.
आमचं आयुष्य गेलं; पण असा वेगळा पेन्शन योजना उपक्रम या गावात कधी पाहिला नाही. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाचशे रुपये निराधार लोकांना पेन्शन चालू केल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत, सावली संस्थेने आम्हाला म्हातारपणी सावली दिल्यासारखे आहे.
- सुभद्राबाई लोहार, लाभार्थी,