राज्यातील २२१६, सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत; सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष
By दीपक शिंदे | Published: June 14, 2023 12:14 PM2023-06-14T12:14:46+5:302023-06-14T12:15:11+5:30
निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार
सातारा : राज्यातील २२१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामध्ये जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित आणि चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा सोडत कार्यक्रम दि. १६ जून ते दि. १४ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी, राज्यातील २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्या आहेत. प्रभाग रचना पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या तसेच ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित न झालेल्या अशा ७९ ग्रामपंचायतीवगळता उर्वरित २२१६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानुसार दि. १६ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना देणे, दि. २१ जूनला विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. २२ जूनला सोडतीनंतर विभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप स्वरूप प्रसिद्ध करायचे आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना २३ जून ते ३० जूनपर्यंत करायच्या आहेत. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी हे ६ जुलैपर्यंत अभिप्राय देतील. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी दि. १४ जुलैला मान्यता देतील तर दि. १४ रोजी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.