सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

By नितीन काळेल | Published: July 4, 2024 07:05 PM2024-07-04T19:05:25+5:302024-07-04T19:05:40+5:30

सवा दोन लाख लाभार्थी : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत 

115 crore crop insurance compensation to farmers of Satara district  | सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सवा दोन लाख शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावरही वर्ग झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासन बाकीचा भार उचलत होते. मात्र, गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. शेतकरी एक रुपया भरुन योजनेत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी खरीप हंगामात एक रुपयाची योजना सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पावणे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. पावसाच्या वार्षिक सरासरीनेही १०० टक्क्यांचा पल्ला गाठला नव्हता. तसेच सर्वच तालुक्यात पाऊस कमी होता. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसलेला. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे. जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पीक नुकसान भरपाईपोटी ११५ कोटी रुपये जमा झाले आहेत. विविध पिकांच्या नुकसानीसाठी ही भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील सवा दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

पाच वर्षांतील सर्वात मोठी भरपाई रक्कम..

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये २०२३ मधील खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळालेली रक्कम सर्वाधिक आहे. २०१९-२० वर्षात ७४ हजार १४० शेतकरी योजनेत सहभागी झाले होते. त्यावेळी नुकसानीसाठी ७ कोटी ६१ लाख रुपये हे ३१ हजार ५५७ शेतकऱ्यांना मिळालेले. २०२०-२१ मध्ये २४७ शेतकऱ्यांना ६ लाख रुपये मिळाले होते. तर २०२१-२२ वर्षात १६६ शेतकऱ्यांना ५ लाख तर २०२२-२३ वर्षात ४९४ शेतकऱ्यांना ९ लाखांची भरपाई मिळालेली. २०२३ च्या खरीप हंगामात २ लाख ७६ हजार शेतकरी विमाधारक होते. त्यातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना ११५ कोटी मिळालेले आहेत.

निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा. यासाठी एक रुपया भरावा लागणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच्या पीक नुकसानभरपाई अंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ११५ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. यावर्षीही शेतकऱ्यांनी या योजनेत १५ जुलैपूर्वी सहभाग घ्यावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: 115 crore crop insurance compensation to farmers of Satara district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.