सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त
By नितीन काळेल | Published: April 25, 2023 03:47 PM2023-04-25T15:47:40+5:302023-04-25T15:48:22+5:30
जानेवारीपासून करवसुली मोहीम
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कर वसुलीची मोहीम तीव्र केल्याने मार्चअखेर घरपट्टीची ८७ तर पाणीपट्टीची करवसुली ८९ टक्के झाली. यातून ग्रामपंचायतींना सुमारे ११५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विकासकामांना याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या वतीने लोकांना विविध सुविधा देण्यात येतात. त्यासाठी ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च महिनाअखेरीसपर्यंत हा कर भरावा लागतो. यासाठी ग्रामपंचायती मोहीम आखून कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतात; पण काहीजण हे कर भरत नाहीत. त्यांचा कर थकीत राहतो. ग्रामपंचायतींचा अधिक करून घरपट्टी आणि पाणीपट्टीचा कर असतो.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जानेवारीपासून करवसुली मोहीम तीव्र केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली करवसुली होण्यासाठी तयारी करण्यात आलेली. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षीही मार्चअखेर घर आणि पाणीपट्टीची करवसुली चांगली झाली आहे.