सांगलीच्या हळद व्यापाऱ्याकडून आणखी १२ शेतकऱ्यांना गंडा; जांबच्या शेतकऱ्यांची १२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2022 02:20 PM2022-09-04T14:20:42+5:302022-09-04T14:21:26+5:30
जांबमधील १२ शेतकऱ्यांकडून सारडा याने हळद खरेदी करून त्याने त्याचे पैसे परत केले नाहीत.
- दत्ता यादव
सातारा: सातारा तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ३२ लाखांना गंडा घालणाऱ्या सांगलीच्या हळद व्यापाऱ्याने वार्इ तालुक्यातील जांब या गावातील आणखी १२ शेतकऱ्यांची १२ लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राजकुमार रमेशचंद्र सारडा (मूळ रा. महावीर नगर, गुजराथी हायस्कूल जवळ सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या हळद व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याने सातारा तालुक्यातील मर्ढे येथील ११
शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच आता जांबच्या शेतकऱ्यांनीही भुर्इंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
जांबमधील १२ शेतकऱ्यांकडून सारडा याने हळद खरेदी करून त्याने त्याचे पैसे परत केले नाहीत. अशा प्रकारे त्याने या शेतकऱ्यांची १२लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. जांबमधील शेतकरी शंकर तुकाराम शिंदे यांनी सर्व १२ शेतकऱ्यांच्या वतीने भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत हवालदार एस.एम. तोडरमल हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा तक्रारींचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘त्याचे’ अजूनही येतायत शेतकऱ्यांना फोन
सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याच्याविरोधात पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. एकीकडे पोलीस त्याचा शोध घेतायत. तर दुसरीकडे तो अद्यापही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फोन करून ‘मी तुमचे पैसे देतो, पोलीस ठाण्यात जाऊ नका,’ अशी विनंती करत आहे. असे असताना तो पोलिसांना कसे सापडत नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.