फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:21 PM2023-02-04T19:21:22+5:302023-02-04T19:22:07+5:30
फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार
फलटण : केंद्र सरकारने बजेटमध्ये फलटण-पंढरपूर व फलटण बारामतीरेल्वे मार्गासाठी १२० कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद केली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि राज्याच्या भागीदारी तत्त्वावर होत असलेल्या फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये निधीची तरतूद केली व मंजुरी दिली. त्याच पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थराज्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेवून याबाबत आग्रहाची मागणी केली.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये १२० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून वीस कोटी रुपये मंजूर केले आहे.
यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. जेणेकरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न काहीच दिवसात पूर्ण होणार आहे.
तसेच यामुळे फलटण पंढरपूर, फलटण बारामती फलटण लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाच स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल तसेच खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातल्या पाणी व रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षात आता मार्गी लागल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वेसाठी भरीव तरतूद केल्याबद्दल रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा केंद्रीय अध्यक्ष , अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.