धारदार शस्त्रानं भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 04:55 PM2017-11-18T16:55:37+5:302017-11-18T16:58:55+5:30
चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
क-हाड (सातारा) : चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान हल्लेखोर पसार झाले आहेत. प्रथमेश संजय सपकाळ (वय 18 वर्ष)असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रथमेश सपकाळ हा पाटण येथील रहिवासी होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्ले गावच्या हद्दीत भटकीमाळ नावाचे शिवार असून, या शिवारात रेल्वेरुळानजीक युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शनिवारी दुपारी क-हाड तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कॉलेजच्या गणवेशातील सुमारे 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
यावेळी पाहणी केली असता प्रथमेशच्या गळ्याजवळ तसेच पोटावर चाकूने भोसकल्याचे आढळले. प्रथमेशच्या खिशात महाविद्यालयाचे ओळखपत्र आढळल्याने त्याची ओळख पटली. प्रथमेशची हत्या सकाळच्या सुमारास झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. शिवाय, घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू तसेच एक रुमाल देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, प्रथमेशचे मारेकरी फरार आहेत.