गावोगावच्या मूलभूत सुविधांसाठी १३ कोटी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:10+5:302021-07-16T04:27:10+5:30
वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील विविध गावांतील लोकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या ...
वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील विविध गावांतील लोकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या सर्व गावांची मूलभूत विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण सुविधा व पूल रस्ते परीक्षण योजनेंतर्गत १३ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील ग्रामीण भागातील विविध गावांच्या प्रलंबित मूलभूत समस्या दूर व्हाव्यात, यासाठी लोकांची सातत्याने मागणी होती. यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते सुधारणा, बंदिस्त गटार बांधणी, संरक्षक भिंत उभारणी, स्मशानभूमी व दफनभूमीची सुविधा, गावचे पाणंद रस्ते, वाडी वस्तीचे ओढ्यावरील पूल, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या सुविधा, प्राथमिक शाळांची दुरुस्ती तसेच दळणवळणाचे छोटे जोड रस्ते यांचा समावेश होता. ही विकासकामे मार्गी लागून ग्रामीण जनतेचे दैनंदिन जीवन सुखर व्हावे, यासाठी मतदारसंघातील लोकांच्या मागणीनुसार विविध गावातील एकूण ११३ कामांना राज्य शासनाच्या गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेतून १० कोटी आणि पूल व रस्ते परिरक्षण योजनेतून ३ कोटी असे एकूण १३ कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. लवकरच या कामांची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत वाई तालुक्यातील ५८ कामे, खंडाळा तालुक्यातील ३२ कामे व महाबळेश्वर तालुक्यातील २३ कामांचा समावेश करून प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे.