माण तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्रात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:19+5:302021-07-01T04:26:19+5:30

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ४५ गावांनी कोरोनावर मात करीत रुग्णसंख्या शून्यावर आणली आहे. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने ...

13 villages in Maan taluka in restricted area! | माण तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्रात !

माण तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्रात !

googlenewsNext

वरकुटे-मलवडी :

माण तालुक्यातील ४५ गावांनी कोरोनावर मात करीत रुग्णसंख्या शून्यावर आणली आहे. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध थोड्याफार प्रमाणात शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरल्याचे चित्र माणमधील खेडोपाड्यात पाहावयास मिळत असून, अजूनही १३ गावे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत.

कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी येताच शासनाने निर्बंधामध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर राखण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, राजेवाडी, टाकेवाडी, बोडके, जाधववाडी, परकंदी, दहिवडी, मार्डी, मोही, म्हसवड, गोंदावले बुद्रूक, पळशी, मनकर्णवाडी, वरकुटे-मलवडी या तेरा गावांत दहापेक्षा अधिक रुग्ण असल्याने सध्या ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. अनेक गावांना एप्रिल, मे महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला होता. यामध्ये अनेकांनी आपल्या जवळचे नातलग, मित्रांना गमावले. त्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने काही गावातील प्रतिबंधित क्षेत्रे हटविण्यात आली.

तरीसुद्धा काही ठिकाणी नागरिकांची विनाकारण होणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचे विदारक चित्र निदर्शनास येत आहे. एप्रिल-मे महिन्यांत आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृतांचा

आकडा जास्त होता. सर्वच ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचे धाबे दणाणले होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी सर्वांचीच दाणादाण उडाली होती. आता परत खबरदारी न घेतल्यास पुनश्च गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे, मास्क वापरण्याचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन माण तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

(कोट )

शासनाने निर्बंध हटवल्यानंतर बहुतांश ठिकाणी दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन कोरोनाला लांब ठेवण्यासाठी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. अन्यथा तिसऱ्या लाटेचा भयंकर सामना करावा लागेल.

- डॉ. लक्ष्मण कोडलकर,तालुका वैद्यकीय अधिकारी,माण

माण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची आकडेवारी...

बाधित रुग्ण संख्या बरे झालेले उपचाराखाली मृत्यू

मलवडी २,२९४ २,१०५ ११३ ७६

मार्डी ३,१७१ ३,०५९ ६५ ४७

म्हसवड ३,२६१ ३,११५ ५० ९६

पळशी २,०७० १,९३४ ६७ ७३

पुळकोटी १,२६९ १,२०८ ३८ २३

एकूण १२,०६९ ११,४२१ ३३३ ३१५

Web Title: 13 villages in Maan taluka in restricted area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.